शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

फेसबुक आहे एक तृतियांश घटस्फोटांना जबाबदार!

PR
फेसबुकचा प्रणेता मार्क झुकेरबर्गने नुकताच विवाह करून आपल्या फेसबुक पेजवरील स्टेटस 'मॅरिड' असे बदलले. पण याच फेसबुकने गेल्या वर्षात ब्रिटनमधील एकूण घटस्फोटांपैकी ३३ टक्के घटस्फोटांना हातभार लावला आहे. ब्रिटनमधील 'डिव्होर्स ऑनलाइन' नावाच्या कायदाविषयक संस्थेने ही पाहणी केली. त्यात ब्रिटनमध्ये २०११ साली दाखल झालेल्या ५००० घटस्फोट अर्जांचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी ३३ टक्के अर्जदारांनी नवरा किंवा बायकोने फेसबुकवर अपलोड केलेला आक्षेपार्ह मजकूर, फोटो, स्टेटस अपडेट्स आदी बाबी आपल्या वैवाहिक जीवनात मीठ कालवण्यास कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे.

'फेसबुक अँड युवर मॅरेज' या पुस्तकाचे सहलेखक के. जेसन क्राफ्स्की यांच्या मते पूर्वी ऑफिसमध्ये किंवा बाहेरगावी एखाद्या पुरुष किंवा स्त्रीबरोबर ओळख होऊन भानगड होण्यात बराच वेळ लागत असे. आता फेसबुकमुळे माऊसच्या काही क्लिक्समध्ये ते शक्य होत आहे. त्यातून सामान्यत: ज्या व्यक्ती अशा प्रकारांपासून चार हात लांब राहिल्या असत्या त्याही मोहाला बळी पडू लागल्याचे क्राफ्स्की म्हणतात. घटस्फोट झाल्यानंतरही एकमेकांविषयीची खुन्नस काढण्यासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे लक्षात आले आहे.