गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

मन - अमन - नमन

माणसाचं मन मोठं विचित्र असतं. ते पार्‍यासारखं हातातून निसटून जातं, ते फार चंचल असतं, बारा वाटांनी सतत धावत असतं. असं मनासंबंधी कितीतरी लोकांनी कितीतरी तर्‍हांनी सांगून ठेवलं आहे. मनुष्यच फक्त समनस्क असतो, मनुष्याव्यतिरिक्त निम्न श्रेणीच्याप्राण्यांमध्ये सहजप्रवृतींच्या माध्यमातून हे मन व्यक्त होतांना दिसतं. इतरप्राणी इंद्रियाधीन जास्त असतात. तर मानव प्राणी आपल्या मनाच्या आधीन अधिक असतात. असंच दृष्य सामान्यपणे आपणांस दिसतं.

WD
सर्व साधुसंतांची आणि विचारवंतांची एकसारखरी शिकवण असते की, या मनाच्या जोखडातून स्वत:ची सुटका करून घेतली पाहिजे. आपलं मन द्विधा होतं, आपलं एक मन अमुक गोष्ट कर म्हणतं तर दुसरं मन दुसरीच गोष्ट करायला सांगतं. कधी कधी आपल्या मनाचा गोंधळ उडतो, कधी आपलं मन निराश होतं तर कधी आपलं मन वैफल्यग्रस्त होतं. कधी उल्हसित होतं तर कधी बिकट कोंडीत अडकल्यासारखं होतं. मनाचे हे विधिध विभ्रम सतत माणसाला आपल्या तालावर नाचवतात.

'मन ओढाळ ओढाळ' असल्यासारखं कधी एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे वारंवार वळतं तर कधी एखादा कडु आठवणीला इतकं चिटकून बसतं की प्रयत्न करूनही त्यापासून दूर हटत नाही. असाच एक सामान्य मनुष्य एकदा एका सत्पुरुषाकडे गेला आणि अत्यंत कळवळून म्हणू लागला, 'महाराज, काहीही करा पण माझं मन देवावर जाऊ द्या. मी देवाचं नाव घेण्याचा जितका जास्त प्रयत्न करतो तितकं माझं मन भलभलत्या गोष्टींचा विचार करू लागतं. कृपा करून मला काही उपाय सांगा.' सत्पुरुषानं थोडा विचार केला व नंतर त्याला सांगितलं की घरी जा. एका आसनावर स्थिर बस आणि 15 मिनिटं असा प्रयत्न कर की त्या चुकूनही एकदा सुद्धा देवाचा विचार मनात आणू नकोस. जितक्या वेळा देवाचा विचार मनात येईल तितके रुपये तुला दंड ठोठावण्यात येईल. तो मनुष्य घरी आला, एका आसनावर बसला आणि डोळे मिटून वाटेल त्या विषयाचा विचार करू लागला.

देवाचा एकादाही विचार करायचा नाही असादंडक त्याच्या चांगला लक्षात होता आश्चर्य म्हणजे 15 ही ‍मिनिटे वारंवार त्याच्या मनात देवाशिवाय अन्य विचारच येईना. देवाचा विचार नाही करायचा म्हटल्याबरोबर मन बंड करून उठले आणि सतत देवाचाच विचार करू लागले. मनाची गती किती न्यरी असते याचा त्याने पुरेपुर अनुभव घेतला.

मनुष्य हा शरीराधारी असतो. पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेद्रिये यांनी युक्त असतो. या इंद्रियांचे विषय असतात. ते विषय बाहेर असतात त्यामुळे ही इंद्रिये या विषयांच्या मागे सतत बाहेर धावत असतात. बाहेरचे विषय जसे बदलतात तसे या इंद्रियांच्या मागे असलेले मन ही या विषयावरून त्या विषयाकडे धाव घेते. मनाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीभोवती फार काळ रेंगाळत राहते.

भूतकाळात जर काही कटू, उद्वेगात्मक, अपमानकारक घटना घडून गेल्या असतील तर त्या चघळीत राहणे या मनाचा एक फार मोठा छंद असतो. काही सुखकारक गोष्टी घडल्या तरीही त्या चवीने आठवत राहण्याची मनाला एक मोठा उद्योग असतो. सुखदु:खात्मक आठवणींव्यतिरिक्त भविष्य काळातील संभाव्य घटनांबाबत विचार करीत राहणे आणि त्यात रंगून जाणे हाही मनाला एक मोठाच व्याप असतो.

थोडक्यात मन एकतर चटकन भूतकाळात गोते खाते नाहीतर भविष्याच्या विशाल आकाशात झेप घेते. वास्तवाच्या जमिनीवर ते कधी पायरोवून उभेच राहत नाही. बहुतांश माणसे जी दु:खी, कष्टी, थकलेली, भागलेली दिसतात. याचे कारण भूतकाळातील घटनांचे अनावश्यक ओझे गाढवासारखे ते आपल्या पाठीवर वहात राहतात किंवा भविष्यातील खोटी सुंदर, रंगीबेरंगी स्वप्ने पाहत रहतात. या दोन्ही गोष्टी माणसासाठी अपरिहार्य आहेत. यात शंका नाही. परंतु कुठपर्यंत त्या आपणांस उपकारक आहेत आणि केव्हा त्यांचे जड ओझे होणार आहे याचे तारतम्य माणसाला रहात नाही.

आपल्या दैनंदिन जीवनासाठी काही गोष्टींचे स्मरण राहणे आवश्यकच आहे, त्या‍शिवाय आपला व्यवहार सुचारू रूपाने पार पडणार नाही. माणसाचे मन नेमक्या अनावश्यक गोष्टीच स्वत:शी जीवापाड जतन करून ठेवते. अर्थाचा अनर्थ करणे, घटनांचा चुकीचा अन्वय लावणे, कुणाबद्दल विनाकारण मनात अढी ठेवणे, असूया, द्वेष, मत्सर, सूड इत्यादी व्यक्तिमत्त्वाची हानी करणार्‍या विकारांना सतत खतपाणी देणे यामुळे माणसाचे मन दूषित होते, कलुषित होते, गढूळ होते, अशा मनात तथ्याचे, वास्तवाचे स्वच्छ प्रतिबिंब पडू शकत नाही.

म्हणूनच मनाची पाटी ही नेहमी घासून-पुसून स्वच्छ ठेवली पाहिजे. भूतकाळाने त्यावर ज्या वेड्यावाकड्या रेघोट्या ओढून ठेवल्या आहेत त्या पुसून टाकून मनाची पाठी कोरी ठेवण्याची कला साधली म्हणजे त्या पाटीवर वर्तमानाची ताजी अक्षरे उमटू शकतील. दोन बौद्ध भिक्षूंची गोष्ट या संदर्भात लक्षणीय आहे.

थोडक्यात आपल्या मनाला काय काय चिकटेल याचा नेम नाही. मनाचे हे स्वरूप जेव्हां सखोलार्थाने जाणून घेऊ लागतो तेव्हाच मन खर्‍या अर्थाने अमन होते. असे 'अमन' च परमेश्वराला खर्‍या अर्थाने 'नमन' करू शकते.