शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By वेबदुनिया|

पैठणीचे नवरस

पैठणी शब्द कानावर आल्यावर मनात उमटतो भरजरी वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट पांरपारिक प्रकार. पैठणीचा गर्भरेशमी जरीचा आणि काठ रूंद व ठसठशीत वेलबुट्टीचा पदर. संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखीच वेलबुट्टी असणे, हे तिचे खास वैशिष्टय विवाह प्रसंगी नववधूचा श्रृंगार व इतर मंगलकार्यात गृहलक्ष्मीचा साज पैठणीने संपन्न करण्याची परंपरा महाराष्ट्रात आजही दिसून येते.

मराठी स्त्रीच्या सौदर्यांचा आविष्कार पैठणीमुळेच झाला.महाराष्ट्रायीन संस्कृतीत पैठणीचे महत्व हे स्त्रीच्या अस्तित्वाशी जोडले गेले आहे.आज महिला सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून पैठणी कडे बघितले जाते. जेथे मराठी स्त्रीच्या श्रृंगाराचा विषय निघतो तिथे सुरूवातच तिने नेसलेल्या पैठणीने होते. पैठणी महाराष्ट्रीयन स्त्रीच्या सौदर्यांच लेणं आहे, तीचं स्त्रीत्व जपणं आहे, तिची ओळख आहे, म्हणून ती आपल्या जीवन साथीला म्हणते राया मला एक तरी पैठणी घेऊन दया की, तिच्या कपाटात पैठणी असणे हीच तिची संपन्नता दर्शविते.

सध्या दिल्ली येथील प्रगती मैदानात जागतिक व्यापार मेळा सुरू आहे. या दरम्यान प्रत्येक राज्यांना त्यांच्या-त्यांच्या राज्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन येथे घडवावे लागते. यावर्षी महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाने पैठणी हा विषय घेऊन पैठणीचे नवरस सादर केले. उपस्थित दर्शकांनी गुलाबी थंडीत भरजरी पैठणीचा मनसोक्त आनंद लुटला.

श्रुंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक, वीभत्स, अद्भभुत, शांत अश्या नवरसाचे दर्शन मराठी स्त्री पैठणी नेसून कसे व्यक्त करते हे येथे दर्शविण्यात आले. महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती राधिका रस्तोगी यांच्या संकल्पना व दिग्दर्शनातून सादर झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित दर्शकांनी टाळयांच्या गजराने तसेच प्रशंसनीय शब्दांनी प्रतिसाद दिला.

या सांस्कृतिक कार्यक्रमात पैठणीचा जन्म, पैठणीचा उत्तरोत्तर विकास, पैठणीला मिळालेले राजाश्रय या सर्वाचा इतिहास नृत्य नाटिकाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. गेले दोन हजार वर्षे पवित्र गोदातीरी वसलेले पैठण हे कलेचे केंद्र म्हणून आजही त्याच अभिमानाने ओळखले जाते. पैठण नाववरूनच ‘पैठणी ’ हे नाव या महावस्त्राला मिळाले. पैठणच्या सातवाहन राज्याचा या कलेला राजाश्रय होता. - जुनी पैठणी सोळा हात लांब व चार हात रूंद असून तिच्या काठापदरावर वेलबुट्टी किंवा पशुपक्ष्यांच्या प्रतिमा असत. हे सगळं नृत्य नाटयाच्या माध्यमाने बघत असताना प्रेक्षक अगदी भारावल्यासारखे होत होते.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत पैठणीची परंपरागत शैली व उच्च दर्जा टिकून होता. नंतरच्या काळात लोकाभिरूचीत पालट होऊ लागला आणि पैठणीच्या परंपरागत शैलीमध्ये नवनवे आकृतिबंध निर्माण होत गेले. दोन हजार वर्षांपासून ते आजपर्यंतचे पैठणीचे बदलले रूपडे.

आज पैठणी महावस्त्राने सलवार- कृर्ती , स्कट, टॉप इथपर्यंत नव्या फॅशनशी तिने जुळवून घेतले आहे. या सर्व बदलांना पैठणी या कार्यक्रमातून अतिशय सुंदररित्या दर्शविण्यात आले. जुन्या काळात पैठणी नेसून महिलेची दिनचर्या कशी असायची हेही दाखविण्यात आले. पैठणीवर फॅशन शो ही करण्यात आला तो उपस्थित दर्शकांना भावला देखील. दिल्लीकरांसह परदेशी लोकांनीही पैठणीचा मानाचा मुजरा स्वीकार केला.