शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

वृद्धावस्थेत त्वचेची देखरेख

चेहर्‍यावरील सुरकुत्या वृद्धत्वाची पहिली चाहूल असते. वाढत्या वयामुळे त्वचा ढिली होते व त्यात कोरडेपणा येतो, ज्यामुळे मान, डोळे आणि ओठ त्यांच्या भोवताली रेषा उमटायला लागतात. याच रेषांना आपण सुरकुत्या म्हणतो. वाढत्या वयाच्या जीर्णतेचे ते लक्षण आहे.

त्वचेच्या बाह्य आवरणाखाली ज्या कोषिका असतात त्या कॅलॉजेन आणि इलॅस्टिन नामक प्रोटीन तंतूपासून बनतात. जे त्वचेला कवच प्रदान करतात, लवचिकपणा आणि मृदुता देतात. वय वाढल्यामुळे इलॉस्टिन कमी होते आणि कॅलोजेनचे विघटन होते, परिणामस्वरूप कोषिकांची लवचिकता कमी होते.

चेहर्‍यावरील या सुरकुत्या टाळण्यासाठी रोज नियमित मसाज केला तर फायदा होतो. मसाजमुळे रक्तसंचार वाढतो. ज्यामुळे त्वचेच्या आतवर असलेल्या रक्तवाहिन्यांना पुरेशा प्रमाणात प्राणवायू पोहोचतो.

दिवसभरातून 7-8 ग्लास पाणी पिणे आणि सकाळी लिंबू पाणी मध टाकून घेणे याचाही त्वचेसाठी चांगला फायदा होईल. सुरकुत्यांप्रमाणे डोळ्याखाली काळी वर्तुळेसुद्धा त्वचेच्या सौंदर्यासाठी बाधक ठरतात. मानसिक तणाव, निद्रानाश आणि आहारातील असमतोलपणा यासाठी कारणीभूत असतो.

यासाठी पपई नेहमी खावी, पालकाचे सूप प्यावे या बाबींचा अवलंब केल्यास त्वचा निरोगी राहील आणि वृद्धत्वाची प्रक्रिया टाळता आली नाही तरी लांबविता मात्र नक्की येईल. वृद्धात्वाला रोग न मानता अनिवार्य, स्वा‍भाविक क्रिया समजून आनंदाने, सुख-समाधानाने जीवन व्यतीत करावे.