शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

व्यक्तिविशेष : केशवसुत

WD
‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्‍या कवी केशवसुतांचा आज जन्मदिन. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक कवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी गणपतीपुळ्याजवळील मालगुंड येथे झाला. मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्‍या या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला.

‘वर्डस्वर्थचा प्रभाव असणार्‍या केशवसुतांनी ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’ अशा निसर्गकविता लिहिल्या. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. ‘झुपुर्झा’ ही त्यांची गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. ‘म्हातारी’ या त्यांच्या गूढगुंजनात्मक कविता. 7 नोव्हेंबर 1905 रोजी हुबळी येथे त्यांचे निधन झाले.