गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By मनोज पोलादे|

रंगनाथ पठारे

वास्तव टिपणारा लेखक

रंगनाथ पठारे यांनी कथा, कादंबरी लेखनात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आपल्या कथा, कादंबर्‍यांमधून त्यांनी प्रस्थापित सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.

विविध सामाजिक प्रश्न, रूढी, परंपरा, यातून निर्माण होणारी गुंतागुंत याचे प्रत्ययकारी वर्णन त्यांच्या लेखनातून येते. रंगनाथ पठारे भौतीक शास्त्राचे प्राध्यापक आहेत. विज्ञानाचे प्राध्यापक असतानांही त्यांची साहित्यातील झेप थक्क करणारी आहे.

काल्पनिक बुडबुडे न उडविता वर्तमान व वास्तव रेखाटण्याचा त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. पठारे यांनी दर्जेदार व वर्तमानाशी नाते जोडणारे साहित्य लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

साहित्यातील अनमोल योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतरची महाराष्ट्रातील स्थित्यंतरे त्यांनी 'ताम्रपट' या कादंबरीत टिपली आहेत.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखानदारी, दुध डेअरी, सहकारी पतसंस्थांचे जाळे निर्माण करून आपली राजकीय संस्थाने तयार केली. आर्थिक, सामाजिक, राजकीय नाड्यांवर वर्चस्व प्रस्थापित करून राजकीय समीकरणे बदलून टाकली.

जातीय व वर्गीय एकाधिकारशाही निर्माण केली. यातून तयार झालेल्या नव्या सामाजिक जडणघडणीचा आढावा पठारे यांनी ताम्रपट या कादंबरीतून घेतला आहे. 'दिवे गेलेले दिवस' या कादंबरीत त्यांनी देशात लादण्यात आलेल्या आणीबाणीचा विविधांगाने आलेख मांडला आहे.

आणीबाणीत राजकीय पक्ष, प्रशासन, सामान्य माणूस, एकंदरीत गल्ली ते दिल्लीपर्यंत झालेले बारीक, सारीक बदल याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न पाठारे यांनी केला आहे.

पठारे यांनी आपल्या कादंबरी व कथा लेखनातून मानवी नातेसंबंध, भावभावनांची गुंतागुंत मांडतांना प्रश्नाच्या मूळापर्यंत पोचण्याची किमया साधली आहे.


रंगनाथ पठारे यांचे लेखन-


1. ताम्रपट
2. दिवे गेलेले दिवस
3. गाभारयातील प्रकाश
4. तीव्र कोमल दु:खाचे प्रकरण
5. अखेरचे दिवस
6. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो
7. नामुष्कीचे स्वगत
8. कळप
9. भंडारभोग