शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

जेजुरीचा खंडोबा

धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत महाराष्ट्रातील जेजुरीच्या खंडोबा (खंडेराव) मंदिरात. 'खंडोबाची जेजुरी' या नावाने या गावाची ओळख आहे. धनगर समाज बांधवामध्ये जेजुरीचा खंडोबा 'म्हाळसाकांत' किंवा 'मल्हारी मार्तंड' या नावानेही ओळखला जातो. खंडोबा हे प्रामुख्याने धनगर समाजाचे कुलदैवत आहे. इतर समाजातही खंडोबा कुलदेवता आहे. मराठी परंपरेनुसार विवाहित जोडपे आधी खंडोबाचे दर्शन घेतात व त्यानंतर संसाराला लागतात.

जेजुरी हे पुरंदर तालुक्यात पुणे- बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे. जेजुरीला खंडोबाचे मंदिर एका उंच टेकडीवर असून जवळपास दोनशे पायर्‍या चढून मंदिरात जावे लागते. टेकडीवरून संपूर्ण जेजुरीचा विलोभनीय देखावा पाहून प्रवासातील शीण क्षणात नाहीसा होऊन जातो. मंदिराच्या पायथ्याशी प्राचीन दीपमाळ आहे. त्या प्रज्वलित झाल्यानंतर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात खंडोबाचे मंदिर उजळून निघते.

WDWD
खंडोबाचे मंदिर दोन भागात आहे. पहिल्या भागात मंडप तर दुसर्‍या भागात गर्भगृह आहे. मंडपात भाविक सामूहिक पूजाअर्चा करतात. गर्भगृहात खंडोबाची चित्ताकर्षक मूर्ती विराजमान आहे. खंडोबाचे मंदिर हेमाडपंथी असून मंदिरात 10X12 फुट आकाराचे पितळी कासव आहे. मंदिर परिसरात ऐतिहासिक शस्त्रेही ठेवण्यात आली आहेत. विजयादशमीला येथील तलवार अधिक वेळ उचलण्याची स्पर्धा घेतली‍ जाते. येथील ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

जेजुरी या गावाला ऐतिहासिक वारसाही आहे. शिवाजी महाराज व त्यांचे वडील शहाजी राजे येथे बर्‍याच वर्षांच्या अंतराने भेटले होते. त्या काळी जेजुरी हा दक्षिण प्रांतातील एक मुख्य किल्ला होता.
WDWD


मध्य प्रदेशातील अहिल्याबाई होळकर यांच्या घराण्याचे जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत होते. मराठी महिन्यानुसार चैत्र, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात येथे भव्य यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक जेजुरीला येत असतात.

कसे पोहचाल?

महामार्ग:
जेजुरी पुणे येथून अवघ्या 40 किलोमीटरवर असून पुण्याहून जेजुरीला जाण्यासाठी बस किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.

रेल्वेमार्ग:
पुणे-मिरज रेल्वे मार्गावर जेजुरी हे रेल्वे स्थानक आहे.

हवाईमार्ग:
जेजुरीपासून सगळ्यात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे.