मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

केरळमधील आट्टुकाल देवीचे मंदिर

WD
केरळमधील तिरूवनंतपुरम शहरातील आट्टुकाल भगवती मंदिराचा लौकीक वेगळाच आहे. धर्मयात्रेच्या या भागात आम्ही या तीर्थक्षेत्राविषयीची माहिती देत आहोत. कलिकालाच्या दोषांचे निवारण करणारी ही जगदंबा केरळची राजधानी तिरूवनंतपुरम शहराच्या दक्षिणेला आट्टुकाल नावाच्या गावात विराजमान आहे.

अनंतपुरी नगरीत अनेक मंदिरे आहेत. काशीइतकेच ते पवित्र असल्याचे येथील भाविकांचे म्हणणे आहे. भारततभरातून येणार्‍या भाविकांच्या उपस्थितीने तिरूवनंतपुरम नगरी सदैव गजबजलेली असते. या भाविकांची यात्रा आट्टुकाल करूणामयी देवीचा आशीर्वाद प्राप्त केल्याने सुफळ संपूर्ण होते.

मंदिराचा इतिहास
WD
आट्टुकाल गावातील मुल्लुवीड कुटुंबाला ही देवी पहिल्यांदा दिसली. तोच मंदिराच्या उत्पत्तीचा आधार मानला जातो. ही देवी पतिव्रताधर्माच्या प्रतीकाच्या रूपात प्रख्यात असलेली कणकींचा अवतार मानली जाते.

पोंकाला महोत्स
WD
आट्टुकाल मंदिराचा पोंकाला उत्सव हा सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध उत्सव आहे. हा सण द्राविडी परंपरेतील आहे. हा उत्सव कुंभ महिन्यात पूर्ण नक्षत्र आणि पौर्णिमा दोघांच्या मीलनाच्या मुहूर्तावर साजरा केला जातो. दिवसा कीर्तन, भजन आणि रात्री लोकनृत्य आणि इतर कार्यक्रम चालतात. संगीत कार्यक्रमदेखील चालतात. सजविलेले रथ-घोडे यांची मिरवणूक निघते. नारळाच्या पानांपासून किंवा चमचमणार्‍या कागदांपासून सजविलेल्या तख्तावर देवीची मूर्ती ठेवून दीपमाळा बनविल्या जातात. त्या डोक्यावर ठेवून वाजत गाजत, संगीताच्या तालावर काढल्या जाणार्‍या मिरवणुका मनमोहक असतात.

नवव्या दिवशी तिरूवनंतरपूरम नगरीचे सर्व रस्ते आट्टुकालकडे जातात. जवळपास पाच किलोमीटरच्या आत असलेली घरे, त्यांचे अंगण, पटांगण, रस्ते, जिथे जिथे रिकामी जागा आहे तिथे पोंकालाचे केंद्र बनते. केरळच नव्हे तर बाहेरूनही पोंकाला नैवेद्य तयार करण्यासाठी लाखोंनी स्त्रिया येथे येतात. या सर्व स्त्रिया एक दिवस आधीच पोंकाला क्षेत्रात येऊन दाखल होतात. त्या आपल्या सोबतच पोंकालासाठी आवश्यक सामग्री तांदूळ, साखर, नारळ, लाकडे घेऊन येतात. या सर्व गोष्टी या ठिकाणाहून खरेदी करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येणार्‍या स्त्रियांसाठी राहण्याची आणि संरक्षणाचीही व्यवस्था अनेक संस्थांकडून केली जाते. पोलिसही जागरूक असतात.

WD
स्वयंसेवक, सेवा समिती, मंदिर ट्रस्टचे स्वयंसेवक या सर्व प्रकारच्या सेवेसाठी कटिबद्ध असतात. प्रयागच्या कुंभ मेळाव्याची आठवण देणारा अशी ही पोंकाला यात्रा आहे. विविध प्रकारचे लेपन करून देवीला सुंदर बांगड्या घातल्या जातात. तेव्हाच उत्सवाचा शुभारंभ होतो. उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण मूर्ती लेपयुक्त होऊन जाते. या काळात देवीचे चरित्र गायले जाते. पांड्य राजाच्या वधापर्यंत हे चरित्र गान केले जाते.

पांड्य राजाच्या वधापर्यंत आनंदोत्सव चालतो. सोबतच पोंकाला चूल पेटविली जाते. नंतर सायंकाळी एका निश्चित वेळी पुजारी पोंकाला पात्रांमध्ये तीर्थजल शिंपडतात तेव्हा विमानातून पुष्पवृष्टी होते. देवीच्या नैवेद्य-स्वीकृतीने प्रसन्न होऊन नैवेद्य डोक्यावर धरून स्त्रिया परत जाऊ लागतात.

कसे पोहोचाल?
तिरूवनंतपूरम सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून हे पीठ फक्त दोन किलोमीटरवर आहे. येथील विमानतळापासून हे ठिकाण सात किलोमीटरवर आहे. भारताच्या सर्व प्रदेशांमधून येथे पोहचता येते. तिरूवनंतपुरम पोहचणारे भाविक रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवरून सरळ आट्टुकालला पोहोचू शकतात. या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी बस, टॅक्सी आणि ऑटो रिक्शा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. श्री पद्मनाभस्वामींच्या मंदिरासमोरून दोन किलोमीटर दक्षिण-पूर्वेला पायी चालत गेलो तर तीस मिनिटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे.