गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

सैलानाचे महाकेदारेश्वर मंदिर

- गायत्री शर्मा

WD
धर्मयात्रेत आज आम्ही आपल्याला भगवान शंकराच्या अर्थात महाकेदारेश्वराच्या मंदिरात घेऊन जात आहोत. मध्य प्रदेशातील रतलामपासून २५ किलोमीटरवर सैलाना नावाचे गाव आहे. येथेच महाकेदारेश्वर मंदिर आहे. येथे लांबून भक्तगण महाकेदारेश्वराचे दर्शन घ्यायला येतात. शिवाय येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत असते. उंच डोंगरांनी वेढलेले हे मंदिर अलौकीक निसर्ग सौंदर्याचेही उदाहरण आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर हे सौंदर्य आणखी खुलते.

WD
डोंगरातून निघालेले धबधबे जमिनीच्या दिशेने वेध घेऊन झेपावतात तेव्हा ते दृश्य पहाणे मोठे रमणीय असते. उंचावरून हे पाणी मंदिराच्या आतल्या भागात असलेल्या कुंडात पडते. अतिशय अवर्णनीय असा हा निसर्गानुभव आहे.

हे मंदिर जवळपास २७८ वर्ष जुने आहे. येथील शिवलिंगही नैसर्गिक आहे. येथे एकच शिवलिंग होते, असे सांगितले जाते. १७३६ मध्ये सैलानाचे महाराज जयसिंह यांनी येथे एक सुंदर मंदिर बांधले. तेच केदारेश्वर महादेव नावाने प्रसिद्ध झाले.

राजा दुलेपसिंह यांनी या मंदिराचा पुढे जीर्णोद्धार केला. मंदिराच्या जवळ असलेल्या कुडांसाठी त्यावेळी दीड लाखाचा खर्च केला. पुढे राजा जसवंतसिहांनी मंदिराच्या पुजार्‍याचा चरितार्थ चालावा यासाठी जमीन दान केली. १९९१-९२ मध्ये पुन्हा एकदा मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला.

WD

येथील पुजारी अवंतीलाल त्रिवेदी यांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर सैलानाच्या महाराजांच्या काळापासून आहे. आता आमची चौथी पिढी या मंदिराची सेवा करते आहे. कितीही उन, वारा, पाऊस असो. देवाची पूजा कधीही चुकलेली नाही. प्रत्येक श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी होत असते.

याशिवाय शिवरात्र, वैशाख पौर्णिमा व कार्तिक पौर्णिमेला भाविकांची गर्दी होत असते. श्रावणात तर कावड घेऊन येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी होत असते. कावडीद्वारे शंकराला जलाभिषेक केला जातो.

कसे जाल?
इंदूरहून रतलान दीडशे किलोमीटरवर आहे. तेथून सैलाना २५ किलोमीटर आहे. येथे येण्यासाठी इंदूरहून बस व टॅक्सी सेवाही आहे. इंदूरहून रेल्वेमार्गे रतलामला जाता येते.