मुंबई: अल्पवयीन प्रेयसीचे डोळे बांधून गळा चिरला! 'क्राइम पेट्रोल' पाहून रचला कट
मुंबईतील कांदिवली येथे एका अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कांदिवली पूर्व येथील समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सिद्धी विश्वकर्मा असे मृत १७ वर्षीय मुलीचे नाव असून, तिचा मृतदेह दामूनगर वनक्षेत्रातून सापडला. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपीने (मुलीचा प्रियकर) 'क्राइम पेट्रोल' हा टीव्ही शो पाहून या हत्येचा कट रचला आणि तो अंमलात आणला. आरोपीचे नाव सूरज वाघमारे (वय २२) असून तो कांदिवली पूर्व येथील रहिवासी आहे.
हत्येनंतर पुरावा नष्ट केला
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला एक खास भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने तिचे डोळे बांधले आणि त्यानंतर चाकूने तिचा गळा चिरला. 'क्राइम पेट्रोल'मध्ये हत्येनंतर पुरावा कसा नष्ट केला जातो, हे पाहिल्यामुळे त्याने मुलीची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपीची त्या अल्पवयीन मुलीशी दीड वर्षांपूर्वी एका गणपती मंडळाला भेट दिली असताना ओळख झाली होती. त्यानंतर, गेल्या दीड वर्षांपासून ते दोघेही प्रेमसंबंधात होते. आरोपी मुलीवर लग्नासाठी दबाव टाकत होता, मात्र तिने त्याला नकार दिला होता.
'क्राइम पेट्रोल' पाहून रचला कट
त्यानंतर, आरोपीने 'क्राइम पेट्रोल' पाहिले आणि मुलीच्या हत्येचा कट रचला. त्याने तिला कांदिवलीतील दामू नगर वनक्षेत्रात भेटायला बोलावले. तिथे, एक खास भेटवस्तू देण्याचे आश्वासन देऊन त्याने तिला डोळे बंद करायला सांगितले. तिने डोळे बंद करताच त्याने चाकू काढला आणि तिचा गळा चिरला. हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला.
आरोपीला अटक
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी समता नगर पोलिसांना माहिती दिली की, जंगलात गस्त घालत असताना त्यांना एक अनोळखी मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर, समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मुलीची ओळख पटवली; अवघ्या एक ते दीड तासाच्या आत मृतदेहाची ओळख पटली. समता नगर पोलिसांनी तरुणीच्या हत्येप्रकरणी सूरज वाघमारे या आरोपीला अटक केली आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाशी संबंधित वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. आरोपी सध्या समता नगर पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
