'प्रिक्स वर्सेल्स 2026' च्या जगातील सुंदर विमानतळांच्या यादीत नवी मुंबई आणि गुवाहाटीचा समावेश
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने नुकतीच एक मोठी बातमी दिली आहे. भारतातील दोन प्रमुख विमानतळे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीचे लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल 2), यांचा 'प्रिक्स वर्सेल्स वर्ल्ड्स मोस्ट ब्युटीफुल एअरपोर्ट्स लिस्ट 2026' मध्ये समावेश करण्यात आला आहे. ही जागतिक मान्यता भारताच्या वाढत्या पायाभूत सुविधा आणि आधुनिक वास्तुकलेची ताकद जगासमोर मांडते. दोन्ही विमानतळांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीने जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे.
तसेच विमानतळांचे उत्कृष्ट डिझाइन आणि पर्यावरणपूरकता ही या प्रतिष्ठित यादीत त्यांच्या समावेशाची प्रमुख कारणे आहे. अदानी समूहाच्या मते, ही मान्यता त्यांच्या उत्कृष्ट पायाभूत सुविधा, शाश्वतता आणि अत्याधुनिक नवोपक्रमाचे प्रतीक आहे. या विमानतळांची उभारणी करताना, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. निसर्ग आणि आधुनिकता यांचा हा समतोल काळाची गरज असून, तो या प्रकल्पांमध्ये उत्तमरीत्या साधला गेला आहे. केवळ बाह्य सौंदर्यच नव्हे, तर प्रवाशांना मिळणारा उत्कृष्ट अनुभव हेदेखील या यशामागील एक महत्त्वाचे कारण आहे. चेक-इनपासून ते बोर्डिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्याधुनिक आणि अखंडित करण्यात आली आहे. या यादीत समावेश झाल्याने हे सिद्ध होते की, भारतीय विमानतळे आता जगभरातील प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
जागतिक यादीत समाविष्ट असलेल्या सर्व विमानतळांपैकी, केवळ तीन विमानतळांना या वर्षाच्या अखेरीस 'जागतिक विजेतेपद' प्रदान केले जाईल. नवी मुंबई आणि गुवाहाटी विमानतळे आता हे प्रतिष्ठित जागतिक विजेतेपद जिंकण्याच्या शर्यतीत सामील झाली आहे. या घोषणेमुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
Edited By- Dhanashri Naik
