1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 (11:54 IST)

बापाचे तुकडे करुन निळ्या ड्रममध्ये भरणारा नराधम मुलगा, आशियाना हत्याकांडाचा थरारक उलगडा!

Lucknow Murder Case
लखनौ: उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आशियाना परिसरात एका २१ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते एका निळ्या ड्रममध्ये लपवले. या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, पोलीस तपासात आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
नेमकी घटना काय?
सेक्टर एल-९१ मधील रहिवासी मानवेंद्र सिंग (वय ४५) हे मोठे व्यावसायिक होते. त्यांचा मुलगा अक्षत उर्फ राजा याने २० फेब्रुवारीच्या पहाटे वडिलांची हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, अभ्यासावरून झालेल्या वादातून अक्षतने वडिलांच्याच परवानाधारक रायफलने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहाचे करवतीने तुकडे केले हात आणि पाय जंगलात टाकाले आणि धड घराच्या गच्चीवर एका निळ्या ड्रममध्ये लपवून ठेवले.
 
४ महिन्यांपूर्वीची चोरी आणि वादाची ठिणगी
पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, बाप-लेकातील वादाचे मूळ केवळ अभ्यास नव्हते. सुमारे चार महिन्यांपूर्वी मानवेंद्र सिंग यांच्या घरातून मौल्यवान दागिने चोरीला गेले होते. सुरुवातीला घरातील नोकरावर संशय घेऊन तक्रारही करण्यात आली होती. मात्र नंतर ही चोरी खुद्द अक्षतनेच केल्याचे उघड झाले. मुलाची बदनामी होऊ नये म्हणून वडिलांनी तक्रार मागे घेतली, पण तेव्हापासून त्यांनी अक्षतवर कडक निर्बंध घातले होते. वडिलांची ही शिस्त अक्षतला जाचक वाटू लागली होती.
 
तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
हत्येनंतर अक्षतने त्याच्या १६ वर्षीय लहान बहिणीलाही जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला चार दिवस एका खोलीत कोंडून ठेवले होते.
वडिलांची हत्या केल्यानंतर अक्षतने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ते दिल्लीला गेल्याचा बनाव त्याने रचला होता.
शेजाऱ्यांना घराभोवती संशयास्पद हालचाली दिसल्या आणि घरातून उग्र दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, मानवेंद्र सिंग घरात शिरताना दिसले पण बाहेर पडताना दिसले नाहीत. उलट अक्षत रात्रीच्या वेळी वारंवार कार घेऊन बाहेर जात असल्याचे फुटेजमध्ये कैद झाले.
 
तणावाखालील कौटुंबिक पार्श्वभूमी
मानवेंद्र सिंग हे पॅथालॉजी आणि दारुचे व्यावसायिक होते. त्यांच्या पत्नीचे २०१७ मध्येच निधन झाले होते. अक्षत NEET ची परीक्षा दोनदा देऊनही नापास झाला होता, ज्यामुळे वडील त्याच्यावर अभ्यासासाठी सतत दबाव टाकत होते. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
 
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी अक्षतविरुद्ध खुनाचा (कलम ३०२) आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून नमुने गोळा केले असून, मृतदेहाचे उर्वरित अवयव शोधण्यासाठी सद्रौण जंगलात शोधमोहीम राबवण्यात आली आहे.