ऑलिम्पिक पदक विजेता टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील
भारताला पहिले एकेरी ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे टेनिसपटू लिएंडर पेस आज दिल्लीत भारतीय जनता पक्षात सामील झाले. २०२१ मध्ये लिएंडर पेस सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. मात्र, आता ते पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी प्रचार करण्यास उत्सुक आहे.
तीन दशकांच्या कारकिर्दीत, पेस यांनी दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आणि आठ दुहेरी व १० मिश्र दुहेरी विजेतेपदांसह एकूण १८ ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली. दोन्ही प्रकारांमध्ये करिअर ग्रँड स्लॅम मिळवणारे ते केवळ तीन खेळाडूंपैकी एक आहे.
टेनिसमधील सर्वाधिक मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम पेस आणि त्यांची माजी जोडीदार मार्टिना नवरातिलोवा यांच्या नावावर संयुक्तपणे आहे.
पेस यांनी एटीपी दुहेरी क्रमवारीत अव्वल १० मध्ये ४६२ आठवडे घालवले, ज्यात ३७ आठवडे ते पहिल्या क्रमांकावर होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एटीपी टूरवर एकूण ५५ दुहेरी विजेतेपदे जिंकली.
पेस यांनी ३० वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने विक्रमी ४५ डेव्हिस कप सामने जिंकले. त्याने १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक खेळांमध्ये एकेरीत कांस्य पदकही जिंकले. माजी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला दुहेरीचा खेळाडू लिएंडर पेस हा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारा पहिला आशियाई पुरुष खेळाडू आहे.
Edited By- Dhanashri Naik