बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (14:31 IST)

जिया खानची हत्याच; ब्रिटिश तज्ज्ञांचा दावा

अभिनेत्री जिया खानच्या तीन वर्षापूर्वीच्या आत्महत्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मान आणि तोंडावरील खुणांवरून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा ब्रिटनमधील न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या अहवालात करण्यात आला आहे.
 
जियाची आई राबिया यांनी ब्रिटिश तज्ज्ञ पायने-जेम्स यांच्याकडून वैद्यकीय व शवविच्छेदन अहवालांची तपासणी करून घेतली. तज्ज्ञांनी दिलेला हा अहवाल रबिया यांना कोर्टात सादर करायचा आहे; मात्र कोर्टाकडून तो स्वीकारला जाण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे बोलले जाते.
 
जिया आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय तपासावर असमाधानी असलेल्या राबिया यांनी पायने-जेम्स यांच्याकडून जियाचा वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवालाची न्यायवैद्यक तपासणी करून घेतली. सरकारी न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, जियाच्या ओठांवरील जखमा या आत्महत्या करताना दातांमुळे झाल्या आहेत. पण पायने-जेम्स यांच्या अहवालानुसार, चेहर्‍यावर कोणत्या तरी वस्तूने जोरात मारल्याने ओठांवर जखमा झाल्या आहेत. या दाताने झालेल्या जखमा आहेत, असे वाटत नाही. तिच्या मानेवरील खुणा ओढणीच्या नाहीत, असेही त्यात नमूद करण्यात आलं आहे.
 
या अहवालावरून भारतीय तज्ज्ञांनी या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास केला नाही, असे वाटते. ब्रिटिश तज्ज्ञांचा हा अहवाल स्वीकारावा, अशी विनंती आम्ही कोर्टाकडे करू, असे राबिया यांचे वकील दिनेश तिवारी यांनी सांगितले. एका खासगी न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पैसे देऊन हा अहवाल तयार करून घेतला आहे. वेगवेगळ्या संस्थांनी या प्रकरणाचा तपास केला असून, त्यात जियाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते, असे सांगत अभिनेता आदित्य पांचोलीने या अहवालाबाबत शंका निर्माण केली आहे. पण एखाद्या प्रकरणाच्या तपासात कोणतीही नवीन बाब समोर आली तर वरिष्ठ न्यायाधीश ती नाकारू शकत नाहीत. कोर्ट कोणत्याही तज्ज्ञांच्या मताचा विचार करू शकतात, असे ज्येष्ठ वकील रिझवान मर्चट यांनी सांगितले.