शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पाटणा , सोमवार, 9 नोव्हेंबर 2015 (07:53 IST)

बिहारमध्ये महाआघाडीची दिवाळी

बिहारमध्ये झालेल्या चुरशीच्या विधानसभा निवडणुकीत अखेर सत्ताधारी राजद, जदयू, काँग्रेस महाआघाडीने २४३ पैकी तब्बल १७८ जागा मिळवून जोरदार मुसंडी मारत मोदी लाटेला धूळ चारली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप युतीला जबरदस्त धक्का बसला आहे. गेल्या वर्षी केंद्रात झालेल्या सत्तांतरानंतर देशात भाजपची लाट निर्माण झाली होती. त्यामुळे मोदींचा वारू निवडणुकांत चौखूर उधळत सुटला होता. तथापि, या वारूला सर्वप्रथम रोखण्याचे काम बिहारी जनतेने केले. त्यामुळे भाजप नेते तोंडघशी पडले आहेत. या अभूतपूर्व विजयामुळे महाआघाडीत उत्साह वाढला असून, नेते आणि कार्यकत्र्यांनी दिवाळीपूर्वीच विजयाचे फटाके फोडून दिवाळी उत्साहात साजरी केली आहे. दरम्यान, काँग्रेसनेही ४० पैकी २७ जागा जिंकत बिहारमध्ये कमबॅक केले आहे. 
 
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी पाच टप्प्यांत झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप युती विरुद्ध लालू-नितीशची महाआघाडी अशी लढत रंगली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर इतर निवडणुकांप्रमाणे हीदेखील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवून बाजी मारण्याचा विश्वास निर्माण केला होता. परंतु गेल्या वर्षभरात चौखूर उधळणा-या या भाजपवारूला रोखण्याचे काम बिहारमधील जनतेने केले आणि भाजपयुतीला केवळ ५८ जागांवरच समाधान मानावे लागले. 
 
मात्र, राजद-जदयू-काँग्रेस महाआघाडीने नव्या जोमाने कमबॅक करीत राज्यात १७८ जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत मिळवले. त्यामुळे महाआघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांच्या गळ्यात आता तिस-यांदा माळ पडणार आहे. या निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने सर्वाधिक ८० जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. त्यानंतर नितीशकुमार यांच्या जदयूला ७१ जागा मिळाल्या असून, त्यांच्याच मित्रपक्षाने ४० पैकी २७ जागांवर विजय मिळवला आहे. परंतु भाजप युतीला फक्त ५८ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यात भाजपला केवळ ५३, तर लोजपा, रालोसपा आणि हम या पक्षांना अनुक्रमे ३, २ आणि १ जागांवरच समाधान मानावे लागले. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागल्याने भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी संसदीय बोर्डाची बैठक घेऊन आढावा घेतला. हा पराभव भाजपला चांगलाच जिव्हारी लागला आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आता परत गुजरातला गेले पाहिजे. नितीशकुमार बिहारची सत्ता सांभाळतील. मी मात्र, भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम करेन, असे राजद नेते लालूप्रसाद म्हणाले. 
२०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप-जदयूने एकत्रित निवडणूक लढवून सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी जदयूला ११५, तर भाजपला ९१ जागा मिळाल्या होत्या, तर राजदला २२, काँग्रेस ४ आणि लोजपाला ३ जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र, आताच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आणि भाजपच्या वारूला रोखण्यासाठी राजद, जदयू आणि काँग्रेस नेते एकत्र आले आणि त्यांनी भाजपला रोखण्यात यश मिळविले. ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. त्यातच त्यांचा दारुण पराभव झाल्याने भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. 
लालूंच्या दोन चिरंजिवाची विजय 
विधानसभा निवडणुकीत राजदने जोरदार कमबॅक केले असून, लालूप्रसाद यादव यांचे तेजप्रताप आणि तेजस हे दोन्हीही चिरंजीव विजयी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना एकाच जागेवरून विजय मिळविता आला. बिहारमधील मिथिला, तिरहूत, सीमांचल, मगध, भोजपूर आणि अंगा या सहा भागात महाआघाडीने बाजी मारली. भाजपला मात्र फक्त तिरहूत भागातच सर्वाधिक १३ जागा मिळाल्या. इतरत्र मात्र हा पक्ष पिछाडीवर राहिला. 
लालूच किंगमेकर 
राजद नेते लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाला गेल्या १५ वर्षांत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे लालूप्रसाद यादव जळपास बिहारच्या राजकारणातून हद्दपार झाल्याची चर्चा देशभरात सुरू होती. परंतु १५ वर्षांनंतर जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकत या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला शानदार विजय मिळवून दिला. त्यामुळे त्यांनी पुन्हा कमबॅक करीत सर्वाधिक ८० जागा मिळवून राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनण्याचा मान मिळविला आहे. 
महाआघाडी सशक्त पर्याय 
बिहार विधानसभा निवडणुकीत जातीय धु्रवीकरण करण्याचा प्रयत्न करणा-यांना येथील जनतेने नाकारले, अशी प्रतिक्रिया जदयू नेते नितीश कुमार यांनी दिली आहे. या निवडणुकीतून महाआघाडी हा सशक्त पर्याय देऊ शकते, हे सिद्ध झाले आहे, असे विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नितीशकुमार म्हणाले. हा जनतेचा आणि महाआघाडीचा विजय आहे, असेही ते म्हणाले. 
आता मोदींची सत्ता उलथवून टाकणार : लालू 
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार कायम राहणार आहेत. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा पक्ष निकालात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी नितीश यांच्याकडे राज्याची धुरा राहील. यानंतर मात्र आपण देशभरात आंदोलन करुन भाजपला उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे लालूप्रसाद म्हणाले. 
हा मोदींचा पराभव : खा. संजय राऊत 
बिहार निवडणुकीत मोठा विजय मिळविणा-या नितीश कुमार यांना शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, बिहारमधील भाजपच्या पराभवाची जबाबदारी ही मोदींचीच आहे. 
विजयाचे खरे सूत्रधार प्रशांत किशोर ! 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाणक्य अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी ऐन निवडणुकीत मोदींची साथ सोडून , नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार यांच्या प्रचाराची धूरा किशोर यांनी सांभाळून नितीश यांची सत्ता टिकविण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.