शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (12:00 IST)

तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप करमाळ्याची कमलाभवानी माता

करमाळ्याच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवरील मंदिरातील करमाळ्याची आराध्य देवता श्री कमलाभवानी माता ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते. 17 व्या शतकामध्ये मराठा सरदार व तुळजाभवानीचे उपासक राजे रावरंभा निंबाळकर यांच्या काळात करमाळ्यामध्ये कमलाभवानी मातेचे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर बांधकाम व देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
 
कमलाभवानीचा इतिहास पाहिला तर मराठा सरदार राजे रावरंभा निंबाळकर यांच्या उपासनेमुळेच तुळजापूरची तुळजाभवानी माताच करमाळ्यात दाखल झाल्याचे सांगण्यात येते. तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानल्या जाणार्‍या करमाळ्याच्या कमलाभवानी मातेला मोठा इतिहास लाभला आहे.
 
शहराच्या पूर्वेकडील माळावर वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेचा नमुना असणारे कमलाभवानीचे मंदिर 17 व्या शतकात बांधण्यात आलेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसत आहे. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायर्‍यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे. मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे. त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. गाभार्‍यात श्री विष्णू-लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभार्‍यात सूर्यनारायणाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
 
एकाच मंदिरात पाच देवतांचे शक्तिपंचायतन असलेले करमाळ्यातील कमलाभवानी मातेचे मंदिर दुर्मिळ आहे तसेच कार्तिक स्वामींची मूर्तीदेखील या मंदिरामध्ये पाहावयास मिळेल. या शिवाय मुख्य मंदिराच्या समोर तीन गगनचुंबी गोपुरे आहेत. शहरामध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश करताना दूरावरूनच देवी मंदिराचे स्थान दर्शविणारी ही गोपुरे उत्कृष्ट बांधणीची साक्ष देत उभी आहेत. मंदिर बांधणीचा विचार केला तर या मंदिर बांधकामात 96 या आकड्याला फारच महत्त्व दिल्याचे स्पष्ट होत आहे. कारण 75 फूट लांबी व 65 फूट रुंदीच्या या मंदिराची उभारणीच 96 खांबांवर झाल्याचे दिसत आहे. येथील नवरात्र महोत्सव व कार्तिकी यात्रा उत्सव हे दोन उत्सव प्रसिद्ध आहेत. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंतचा नवरात्रोत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. याकाळात लाखो भाविक देवी दर्शनासाठी येत असतात. कार्तिकी यात्रा ही कार्तिकी पौर्णिमेपासून पुढे पाच दिवस असते. यात्राकाळातील छबिन्यावेळीही भाविकांची मोठी गर्दी असते. सोरटे व पुजारी हे परंपरेनुसार पुजारी म्हणून कार्यरत असून देवीला एकूण 28 सेवेदार मानकरी आहेत.
 
-किशोरकुमार शिंदे