मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

'स्लमडॉग'मधल्या लतिकाला व्हायचेय 'प्रीती झिंटा'

IFM
ऑस्करच्या स्पर्धेत असलेल्या स्लमडॉग मिलिनियरमध्ये लतिकाची भूमिका करणारी रूबिना आत्ताच हॉलीवूडची स्टार झालीय. आजही मुंबईतल्या झोपडपट्टीच रहाणाऱ्या रूबिनाला हॉलीवूडचे आकर्षण नाही. उलट मायानगरी मुंबईतच तिला प्रीती झिंटा व्हायची इच्छा आहे.

स्लमडॉगला मिळालेल्या यशाने रूबिनाही प्रकाशात आली आहे. या चित्रपटात लतिकाच्या बालपणाची भूमिका तिने केलीय. चित्रपटाच्या यशानंतर बॉलीवूडच्या ग्लॅमरस जगात ती हरवून गेलीय. हे जगही तिच्या आवडीचे आहे. तिच्या स्वप्नातले आहे. मला चित्रपट आवडतात. कविताही आवडतात नि शाळाही, असे ही तेजस्वी डोळ्यांची मुलगी सांगते. आठ वर्षाच्या या चिमुरडीकडे कमालीचा आत्मविश्वास आहे. बोलताना तो जाणवतोही. शाळेत शिकलेल्या इंग्लिश पोएम्स ती अगदी आत्मविश्वासाने म्हणून दाखवते.

रूबिना इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेत जाते. तिथेही तिने पहिली ग्रेड चुकवलेली नाहीये. आणि ही शाळा म्हणजे स्लमडॉगचा दिग्दर्शक डॅनी बॉयल अंकलने दिलेली भेट आहे. चित्रपटात काम करणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांना फारसे पैसे दिले जात नाही, हा आक्षेपच रूबिनाने हे सांगून खोडून काढला.

स्लमडॉगची कहाणी प्रत्यक्षात काही प्रमाणात रूबिनाच्या भोवतीही फिरणारी आहे. ती ज्या झोपडपट्टीत रहाते तिथे तिची एक छोटी झोपडी आहे. चार लाकडी दांड्यांनी उभी केलेली. या झोपडीभोवती बकालपणाही खच्चून आहे. शौचालयाचे पाणी तिच्या झोपडीबाहेरून वहात असते. पण अशाही परिस्थितीत या चित्रपटाने तिचे जीवन बदलले आहे. चित्रपटाच्या निमित्ताने तिला शाळा मिळाली. प्रिमियरच्या निमित्ताने फोटो काढले गेले. आणि हो, हेलिकॉप्टरमध्ये बसायलाही मिळाले.

बॉयल यांनी रूबिनाला गेल्या जूनमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. तिची शाळेची बॅग, शूज, कपडे दिले. शिवाय तिचा शाळेचा महिना पंधराशेचा खर्च आपण देणार असल्याचे सांगितले. एवढे नव्हे, तर तिच्या शाळेतल्या शिक्षकांनाही ते भेटले. या चित्रपटाची निर्मिती करणार्‍या फॉक्स स्टार स्टुडीओजनेही मोठ्या अभिनेत्यांना मिळणार्‍या मानधनाच्या तिप्पट रक्कम या बालकलावंतांना दिली आहे. मात्र, त्याचा आकडा त्यांनी जाहीर केलेला नाही.

बॉयल आणि या चित्रपटाचे निर्माते ख्रिस्तियन ओल्सन यांनी रूबिनाच्या शिक्षणाचा सर्व खर्च तिच्या १८ व्या वर्षांपर्यंत करण्याचे मान्य केले आहे. शिवाय मोठेपणी तिच्या हाती एक मोठी रक्कम पडेल अशी व्यवस्थाही त्यांनी केली आहे. अर्थात तरीही रूबिनाची आई मुन्नीबाईला तिच्या भवितव्याबाबत साशंकता आहे.

घरकाम करून गुजारा करणार्‍या मुन्नीबाईला रूबिनासह पाच मुले आहेत. आता तिच्या भवितव्याची चिंता आहे.

बॉयल यांनी केवळ चित्रपट दाखवून भारतातली गरीबी विकली असे म्हणणारे महान नायक आपल्या देशात आहेत. शिवाय थोडेसे सामाजिक कार्य करून आपण दानरूपी 'अमर' राहू याची तरतूद करणारे हे महानायक परदेशी चित्रपटकर्मीचा सामाजिक दायित्व निभावूनही त्याची वाच्यता न करण्याचा वसा अंगीकारतील काय?