मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (16:54 IST)

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून द्या

रात्रीच्या वेळेतच हॉटेल, रेस्टॉरंटचा निम्म्याहून अधिक व्यवसाय होतो. मद्यालयामध्ये (परमिट बार) तर ऐंशी टक्के व्यवसाय हा रात्रीच्या वेळी होतो. त्यामुळे सध्याची दहाची वेळ हॉटेल आणि बारसाठी पुरेशी नाही. ती किमान रात्री साडेअकरापर्यंत वाढवावी अशी मागणी पिंपरी चिंचवड आणि पुणे हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
 
टाळेबंदीच्या अखेरच्या टप्प्यात हॉटेल आणि बारला एक ऑक्टोबर पासून सशर्त परवानगी दिली आहे. कोविड पूर्वी रात्री साडेबारापर्यंत हॉटेल आणि बारला परवानगी होती. आता सकाळी साडेआठ ते रात्री दहा या वेळेत हॉटेल सुरू राहतील. तसेच पन्नास टक्के क्षमतेने हॉटेल सुरू ठेवण्याचे बंधन घातले आहे. राज्यात नुकतीच ठाणे, वसई, विरार येथे हॉटेल, बारची वेळ रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वाढविली आहे. त्याप्रमाणे वेळ वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांची भेट घेऊन हॉटेलची वेळ वाढविण्याची मागणी केली. यावेळी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून त्या बाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे सचिव गोविंद साळवे यांनी दिली.
 
शहरात शाकाहारी आणि मांसाहारी हॉटेलमध्ये दिवसभरात होणाऱ्या एकूण व्यवसाय पैकी साठ टक्के व्यवसाय रात्री आठ नंतर होतो. तर शनिवार-रविवार वगळता बारचा ऐंशी टक्के व्यवसाय रात्रीच होतो. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारला रात्री साडेअकरा पर्यंत परवानगी द्यावी असे पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे सचिव गणेश कुदळे म्हणाले.