केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात, यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली
पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात जुन्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया झाली असून त्यांना एक महिना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना या दुखापतीची पार्श्वभूमी सांगितली
मोहोळ यांचे हे दुखणे 29 वर्षांपूर्वी कोल्हापुरात कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीने आहे. या दुखापतीमुळे त्यांना मीठ त्रास सहन करावा लागला आणि कुस्ती सोडावी लागली. दुखापतींकडे दुर्लक्ष केल्यावर आता पुन्हा तो त्रास उदभवल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.आणि त्यांच्या गुडग्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी त्यांना एक महिना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ पुढील सात ते आठ दिवस तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच उपचार घेतील.
सध्या संसदचे अधिवेशन सुरु असल्याने त्यांना काही काळ कामकाजपासून दूर राहावे लागणार आहे. अशा महत्त्वाच्या काळात ही शस्त्रक्रिया करावी लागल्याने मोहोळ यांनी हळहळ व्यक्त केली. विशेषतः आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेता येणार नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. मात्र नागरिकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांच्या बळावर आपण लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा कामाला लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.