३ वेळा विष प्रयोग करूनही वाचली, अखेर शिक्षक पतीने रचला अपघाताचा कट
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच पत्नीचा काटा काढण्यासाठी एका शिक्षक पतीने जे क्रूर पाऊल उचलले, ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांची त्यांच्याच पतीने सुपारी देऊन हत्या केल्याचा खळबळजनक खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाची सविस्तर प्रकरण याप्रकारे आहे-
३ वेळा विष प्रयोग करूनही वाचली, अखेर अपघाताचा कट
पोलिस तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी पती प्रकाश गावंडे याने यापूर्वी तीन वेळा वृषाली यांना अन्नातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिन्ही वेळा वृषाली यांचा जीव वाचला. वारंवार अपयशी ठरल्यानंतर पतीने अत्यंत थंड डोक्याने अपघाताचा बनाव रचून हत्येचा शेवटचा प्लॅन आखला.
नेमकी घटना काय?
२ मार्च रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ ही घटना घडली. वृषाली गावंडे नेहमीप्रमाणे स्कूटीने शाळेत जात होत्या.
मागून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने त्यांच्या स्कूटीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला.
सुरुवातीला हा एक सामान्य रस्ते अपघात वाटत होता, पण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि या अपघातामागचे भयानक सत्य बाहेर आले.
१ लाखात दिली हत्येची सुपारी
कौटुंबिक वादातून पतीने वृषाली यांचा काटा काढण्याचे ठरवले होते. यासाठी त्याने आपला साथीदार मंगेश चुलकार याच्या मदतीने मनीष सूर्यवंशी याला १ लाख रुपयांची सुपारी दिली. २ मार्च रोजी मनीषने टाटा इंट्रा गाडीने वृषाली यांच्या स्कूटीचा पाठलाग केला. संधी मिळताच त्याने गाडी जोरात धडकवून वृषाली यांची हत्या केली.
कसा लागला छडा?
घटनेनंतर जळगाव जामोद पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवले. संशयास्पद वाटलेल्या पांढऱ्या गाडीचा (MH 28 BB 5753) शोध घेतला असता ती गाडी मनीष सूर्यवंशीची असल्याचे स्पष्ट झाले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व गुन्ह्याची कबुली दिली.
मुख्य आरोपी आणि कायदेशीर कारवाई
पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. प्रकाश अनंता गावंडे (मुख्य सूत्रधार आणि पती), मंगेश चुलकार (मध्यस्थी करणारा मित्र), मनीष सूर्यवंशी (सुपारी घेणारा वाहन चालक). या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका सुशिक्षित शिक्षक पतीने आपल्याच पत्नीचा अशा प्रकारे अंत करावा, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.