गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 16 मार्च 2026 (15:05 IST)

बोर्डाच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली; महाराष्ट्रात दहावी-बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरणात तब्बल 103 शिक्षक निलंबित

Suspended
दहावी-बारावीच्या (SSC-HSC) २०२६ मधील बोर्ड परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी  प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०३ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेत पारदर्शकता राखण्यासाठी यंदा सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण १०३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात चौसाळा येथील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याने सामूहिक कॉपीचे दृश्य टिपले. यात शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांना मदत करताना आढळले. या केंद्रावरील १७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
 
छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील केंद्रावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २१ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
 
वाशिम येथेही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आढळल्याने २२ शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
 
गडचिरोलीत एका केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आला, ज्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली.
 
'कॉपीमुक्त अभियान' २०२६
महाराष्ट्र सरकारने यंदा 'कॉपीमुक्त परीक्षा' अभियानांतर्गत कडक पावले उचलली होती.
नियम मोडणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली. 
ज्या केंद्रांवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत केली, तिथे संपूर्ण संच बदलण्यात आला.
भरारी पथके आणि वेबकास्टिंगद्वारे थेट मंत्रालयातून देखरेख ठेवण्यात आली.
बोर्डाच्या या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि गुणवत्तेला महत्त्व देण्यासाठी ही कठोर पावले उचलल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
Edited By- Dhanashri Naik