नागपुरात १५ वर्षीय मुलीचा ३५ वर्षांच्या व्यक्तीशी बालविवाह; बाल संरक्षण विभागाकडून मुलीची सुटका
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मालापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह ३५ वर्षीय व्यक्तीसोबत लावून देण्यात आला. एका धार्मिक कार्यक्रमात हा विवाह सोहळा पार पडला. मात्र बाल संरक्षण विभागाने वेळेत हस्तक्षेप करत मुलीची सुटका केली असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
शाळेतून नेले आणि लग्न लावले
मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे. २३ मार्चपर्यंत ती नियमित शाळेत जात होती. मात्र २४ मार्चपासून ती अचानक शाळेत येणे बंद झाली. २३ मार्च रोजी मुलीची आई शाळेत गेली आणि तिला घरी घेऊन आली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी, म्हणजेच २६ मार्च रोजी एका धार्मिक कार्यक्रमात तिचा विवाह ३५ वर्षीय नवरदेवासोबत लावून देण्यात आला.
बाल संरक्षण विभागाची कारवाई
या बालविवाहाची कुणकुण लागताच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने तपास सुरू केला. पथकाने पीडित मुलीचा जबाब नोंदवला आहे. मुलीचा जन्म २०१० मधील असून तिचे वय केवळ १५ वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे. जबाब नोंदवल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला सध्या बाल गृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
पोस्को (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणात नरखेड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या जबाबावरून 'पोस्को' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे पोलिसांचा संशय?
या विवाहात मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेची भूमिका संशयास्पद वाटत आहे. मुलीची विक्री करून हा विवाह लावला गेला आहे का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. तसेच, या बालविवाहाच्या सोहळ्याला उपस्थित असलेले पाहुणे आणि आयोजक यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील या घटनेमुळे प्रशासन आणि सामाजिक संस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींचे शोषण रोखण्यासाठी बालविवाहासारख्या प्रथांविरुद्ध अधिक कठोर होण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.