मेळघाटातील कुपोषण आणि आरोग्य प्रश्नांवरून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील 'मेळघाट संघर्ष महापदयात्रा' आज चिखलदरा येथे पोहचणार आहे. ठोस निर्णयाशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मेळघाटातील कुपोषण आणि आरोग्य प्रश्नांवरून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चिखलदरा येथे ठिय्या आंदोलन सुरू करणार आहे. "ठोस निर्णयाशिवाय माघार नाही," असा पवित्रा त्यांनी घेतला असून वनविभागाच्या जाचक अटी शिथिल करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे.
माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे मेळघाटातील आदिवासींच्या हक्कांसाठीचे आंदोलन आज, ९ मार्च २०२६ रोजी अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.
तसेच गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेली २५० किलोमीटरची 'मेळघाट संघर्ष महापदयात्रा' आज चिखलदरा येथे पोहचणार आहे. या यात्रेचा समारोप आज तहसील कार्यालयावरील 'तांडव आंदोलनाने' होत आहे. हजारो आदिवासी बांधव आणि प्रहारचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहे.
मुख्य मागण्या
बच्चू कडू यांनी सरकारकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहे
कुपोषण निर्मूलन: मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी तात्पुरत्या उपायांच्या ऐवजी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
आरोग्य सुविधा: अतिदुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी आणि आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करावे.
वनविभागाचे नियम: वनविभागाच्या जाचक अटींमुळे मेळघाटातील रस्ते, वीज आणि पाणीपुरवठ्याची कामे अडकली आहे. या अटी शिथिल करून आदिवासींच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा.
कर्जमाफीची आठवण: सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी.
सरकारला थेट इशारा
बच्चू कडू यांनी प्रशासनाला बजावले आहे की, "आम्हाला केवळ आश्वासने नकोत, तर ठोस शासन निर्णय (GR) हवा आहे." जोपर्यंत या मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत चिखलदऱ्यातून हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
प्रशासकीय यंत्रणा सतर्क
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, अमरावती जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस दलाने चिखलदरा परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या काही दिवसांत आंदोलकांनी वनविभागाच्या कार्यालयांना घेराव घातल्यामुळे आजच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पार्श्वभूमी
१ मार्च २०२६ रोजी सेमाडोह येथून या पदयात्रेला सुरुवात झाली होती. मेळघाटातील ३७ हून अधिक अतिदुर्गम गावांतून प्रवास करत बच्चू कडू यांनी आदिवासींच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या आहे.
या आंदोलनासंदर्भात संध्याकाळपर्यंत काय निर्णय होतो किंवा सरकारकडून कोणती प्रतिक्रिया येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Dhanashri Naik