शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2026 (16:26 IST)

बीड: मित्रांनी वाढदिवसाला न बोलावल्याने २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या; "मी एकटा पडलोय," शेवटचं स्टेटस ठेवून संपवलं जीवन

Suicide
बीड: मित्रांसोबत झालेला वाद आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमाला न बोलावल्याने आलेल्या नैराश्यातून एका २४ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील कुंबेफळ गावात घडली आहे. महेश उद्धव भणगे असे मृत तरुणाचे नाव आहे.
 
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, महेश हा आपल्या मित्रांच्या मदतीला नेहमी धावून जायचा. मित्रांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यातही तो आघाडीवर असायचा. मात्र काही दिवसांपूर्वी त्याचा मित्रांसोबत काही कारणावरून वाद झाला होता. सोमवारी (६ एप्रिल) एका मित्राचा वाढदिवस होता, परंतु या कार्यक्रमाला महेशला बोलावण्यात आले नाही. या गोष्टीचा महेशला खूप मोठा धक्का बसला आणि तो मानसिक तणावात गेला.
 
शेवटचं स्टेटस आणि टोकाचं पाऊल
मंगळवारी दुपारी महेश घराच्या छतावर झोपायला गेला होता. तिथेच त्याने विषारी द्रव प्राशन केले. रात्री ८ वाजेपर्यंत तो खाली न आल्याने घरच्यांनी वर जाऊन पाहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
आत्महत्या करण्यापूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर एक भावूक स्टेटस ठेवले होते. त्यामध्ये त्याने लिहिले होते की, "मी माझे दुःख कुणाला सांगू? मी आता पूर्णपणे एकटा पडलो आहे." यावरून तो किती मानसिक त्रासात होता, हे स्पष्ट होते.
 
कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर
महेशच्या वडिलांनी आपल्या मुलाचे भविष्य घडवण्यासाठी स्वतःची जमीन विकून अंबाजोगाई शहरात त्याला कपड्यांचे दुकान टाकून दिले होते. एकुलत्या एक तरुण मुलाच्या निधनाने भणगे कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.