विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा 'यलो अलर्ट' जारी
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने तिथेही 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात एकाच वेळी दोन परस्परविरोधी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे.
एकडे कडक ऊन असतानाच, बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वातावरणात बदल झाला आहे.
हवामान विभागाने प्रामुख्याने काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा: धाराशिव, बीड, लातूर.
विदर्भ: नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि चंद्रपूर.
मध्य महाराष्ट्र: सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा काही भाग.
हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गहू, हरभरा यांसारखी पिके काढणीला आली असताना पावसामुळे नुकसान होऊ शकते. आंबा, द्राक्षे आणि संत्रा बागांना या वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्या जिल्ह्यांत पावसाचा इशारा आहे, तिथेच दिवसाचे तापमान ३९°C ते ४१°C दरम्यान आहे. हवामानातील या टोकाच्या बदलांमुळे दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Edited By- Dhanashri Naik