अनैतिक संबंधातून लष्करी जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केली; वाशीम मधील घटना
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात करंजा शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय लष्कराच्या एका जवानाने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी जवान आणि त्याच्या आई-वडिलांना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजा तालुक्यातील शिवनगरचा रहिवासी २८ वर्षीय ज्ञानेश्वर मडणे याने आपली पत्नी दिपालीची हत्या केली. या घटनेनंतर करंजा शहर पोलिसांनी आरोपी जवान आणि त्याच्या आई-वडिलांना अटक केली आहे. मृत महिलेचा भाऊ, राहुल माने याने करंजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सैनिकाचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि तो पत्नी दिपालीचा सतत छळ करत होता, असा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी या वादासंदर्भात दोन्ही कुटुंबांमध्ये बैठक झाली होती आणि तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी आरोपी सैनिकाने फोन करून सांगितले की, दिपाली घरी पडली असून तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, जेव्हा कुटुंबीय मध्य प्रदेशातील बुरहानपूरहून करंजा येथे आले, तेव्हा त्यांना संशय आला. दिपाली सात महिन्यांची गर्भवती होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. सध्या, करंजा शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस सर्व बाबींचा तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत आहे.
Edited By- Dhanashri Naik

