पुढील दोन दिवस काही भागात तीव्र उष्णतेचा इशारा तर 13 व 15 मार्चदरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता
हवामान विभागाने पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. 13–15 मार्चदरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. एकीकडे पावसाचा इशारा असला तरी मुंबई आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट कायम आहे.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मार्चच्या मध्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार आहे. राज्यात सध्या भीषण उष्णतेची लाट असतानाच, आता अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
पावसाचा अंदाज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, प्रामुख्याने १२ ते १५ मार्च २०२६ दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ: नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि बीड भागांत ढगाळ हवामान राहून हलक्या सरींची शक्यता आहे. जळगाव, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतही पावसाचे सावट आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये १४ आणि १५ मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात सध्या विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट असून पारा ४०°C च्या आसपास आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. १३ ते १५ मार्च दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. येथे वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहू शकतो.
दक्षिण झारखंड आणि उत्तर छत्तीसगडवरील चक्रीय स्थितीमुळे एक द्रोणीय रेषा विदर्भामार्गे जात आहे. यामुळे बाष्पयुक्त वारे सक्रिय होऊन ऐन उन्हाळ्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
Edited By- Dhanashri Naik