गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

कसाबचे वकिल काझमी यांची हकालपट्टी

के.पी.पवार कसाबचे नवे वकील

ND
ND
मुंबई हल्लाप्रकरणाची सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाने पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबचे वकिल अब्बास काझमी यांची त्यांच्या खोटारडेपणामुळे हकालपट्टी केली आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे काझमीने यापूर्वी न्यायालयाची माफी मागितल्याच्या तीन दिवसांनंतर न्यायालयाने काझमींची हकालपट्टी केली. काझमी यांनी न्यायालयाचा सल्ला मानण्यास नकार दिला तेव्हा न्यायाधीश एम.एल.ताहिलियानी यांनी काझमींना बर्खास्त करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने काझमींना ३४० साक्षीदारांमधील ७१ साक्षीदारांना निवडण्यास सांगितले होते. त्यामध्ये पीडीतांचा उपचार करणारे डॉक्टर, पोस्टमार्टम करणारे चिकित्सक, पंचनामा करणारे, प्रयोगशाळेत फॉरेंसिक पुराव्यांचा तपास करणारे आणि मृतदेहांवर दावा करणार्‍या पीडीतांचे नातेवाईक यांचा समावेश होता.

न्यायालयाने काझमींना विचारले की ७१ साक्षीदारांच्या प्रथम श्रेणीपैकी ते किती प्रत्यक्षदर्शींची उलटतपासणी त्यांना घ्यायची आहे, परंतु काझमींनी हा सल्ला खारिज करुन सर्व ३४० साक्षीदारांची उलटतपासणी करण्यावर जोर दिला. त्यावर न्यायाधीशांनी सांगितले की न्यायाच्या हितासाठी काझमी न्यायालयाशी सहकार्य करीत नाहीत. ते सुनावणी पुढे ढकलू पाहत आहेत आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहेत. न्यायाधीशांनी रागावून म्हटले, की 'काझमींना त्यांच्याशिवाय सुनावणी होवूच शकत नाही, न्यायालय असहाय आहे, असे वाटत असावे. पण आता वेळ आली आहे की एकतर काझमींनी स्वतः या प्रकरणातून बाजूला व्हावे किंवा न्यायालयाने त्यांची नियुक्ती रद्द करावी. काझमींच्या जागी न्यायालय आणखी एक वकील नियुक्त करु शकते'.

यानंतर या प्रकरणात मला रस नाही, असे सागत काझमी न्यायालयातून निघून गेले. तत्पूर्वी, न्यायाधीश एम.एल.ताहिलियानी यांनी काझमींना या प्रकरणाची सर्व कागदपत्रे आणि आरोपपत्र त्यांचे सहकारी वकील के. पी. पवार यांना सोपविण्याचे आदेश दिले.

या वादाच्या पार्श्वभूमी दोन दिवासंपूर्वी काझमींच्या वादग्रस्त वक्तव्याची आहे. - २६/११ खटल्यातील सरकारी पक्षाच्या साक्षीदारांची साक्ष संपवणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गेल्या आठवडयात जाहीर केले होते. खटल्याच्या दृष्टीने फारशा महत्त्वाच्या नसलेल्या उर्वरित साक्षीदारांच्या साक्षीसाठी प्रतिज्ञापत्रे सादर करणार असल्याचे निकम यांनी सुरुवातीच्या भाषणात सांगितले होते. त्यानुसार त्यांनी या प्रतिज्ञापत्राच्या प्रती काझमी यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. यापैकी एखाद्या साक्षीदाराची उलटतपासणी आपल्याला करायची आहे का, असे न्या. एम.एल.ताहिलियानी यांनी काझमी यांना विचारले असता निकम यांनी प्रतिज्ञापत्रे न्यायालयात सादर केल्यावर आपण ते सांगू, असे म्हटले. यावर निकम यांनी आपण खटल्याच्या सुरुवातीलाच प्रतिज्ञापत्रे सादर केल्याची माहिती दिली. मात्र, ते अमान्य करत काझमी यांनी तुम्ही तसे म्हटले नसल्याचे सांगितले.

यावर न्या. ताहिलियानी भडकले. इतक्या महत्त्वाच्या विषयावर आपण खोटे बोलत आहात, असे सांगत त्यांनी तुम्हाला आरोपीचा वकील म्हणून न्यायालयाने नेमले असल्याची आठवण काझमी यांना करुन दिली. न्यायाच्या प्रक्रियेला मदत करणे हे तुमचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी काझमी यांना बजावले. बेजबाबदार अशा शब्दात त्यांनी काझमींची संभावना केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या निकम यांनी काझमी सातत्याने खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला होता.