शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By विकास शिरपूरकर|

कोल्हापूर विकासासाठी ११५ कोटीः हर्षवर्धन पाटील

आगामी वर्षातील विविध योजनांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ११५ कोटी ३६ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीनंतर पत्रकारांना बोलताना दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कामे लक्षात घेता २००९ -१० या कॅलेंडर वर्षासाठी ८९ कोटी ३६ लाख रूपयांच्या निधीला मान्यता मिळालेली असून त्यापैकी २९ कोटी रूपयांचा निधी आत्तापर्यंत प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेल्या काही वर्षांचा अनुशेष, दरवर्षी या जिल्ह्याला भेडसावणारी अतिवृष्टीची समस्या, वाढती लोकसंख्या या घटकांचा विचार करून यंदा २० कोटी रूपयांचा जादा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष घटक योजनेतंर्गत २५ कोटी ८७ लाख रूपयांचा निधीही मंजूर झाला असून आदिवासी विकास योजनेकरीताही अतिरिक्त १२ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे असे पाटील यांनी सांगितले.

गेल्या वर्षी मंजुर झालेल्या ६९ कोटी ३७ लाख रूपयांच्या निधीबाबत माहिती देताना पाटील यांनी हा निधी संपूर्णपणे वापरला गेला असल्याचे सांगितले. या निधीतील ४० कोटी रूपये हे राज्य शासनाच्या योजनेप्रमाणे वापरण्यात आले तर उर्वरीत निधी हा जिल्हाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला होता असे पाटील यांनी सांगितले. नजीकच्या काळात येणार्‍या विधानसभा निवडणूका पाहता जिल्ह्यातील आमदारांना त्यांच्याकडे असलेला १ कोटी रूपयांचा निधी आचारसंहिता लागण्याच्या आधी वापरण्याची सूचनाही नियोजन बैठकीत केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.