शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By एएनआय|

नवसपूर्तीसाठी उंचावरून मूल फेकण्याची प्रथा

नवस फेडण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. पण येथील मम्मादेवी मंदिरात नवस फेडण्याची प्रथा अजबच म्हणावी लागेल. नुसती अजबच नव्हे, तर थरारकही. येथे दोन महिन्यापासून चार वर्षांपर्यंतच्या मुलाला वीस फूट उंचीवरून खाली फेकून झेलले जाते. यामुळे म्हणे मुलांची तब्बेत आणि शारीरीक क्षमता सुधारते. अनेक दशकांपासून ही प्रथा सुरू आहे.

भाविक मम्मादेवीकडे नवस करतात. त्यांची नवसपूर्ती झाली की तो फेडण्यासाठी मुलाला उंचावरून खाली फेकले जाते. जयसिंह परदेशी या मंदिराच्या पुरोहितांच्या कारकिर्दीतच ही प्रथा सुरू झाली. ते स्वतः मुलाला वीस फूट उंचीवरून खाली फेकतात. अर्थात खाली मुलाचे सर्व नातेवाईक कापड हातात धरून उभे असतात. पुरोहित मूल बरोबर कापडातच पडेल, या बेताने फेकतात. त्यामुळे त्याला इजा होत नाही.

एखाद्या मुलाला बरे वाटत नसेल. त्याला ताप असेल किंवा एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर ते देवापाशी मागणे मागतात. त्यांचे मागणे पूर्ण झाले की मग त्या मुलाला असे वरून खाली फेकले जाते. नातेवाईकांच्या करवी त्याला झेलले जाते, असे श्री. परदेशी यांनी सांगितले.

साधारणपणे दोन महिने ते चार वर्षापर्यंतची मुले अशी फेकली जातात. इतरांपेक्षा मूल नसणारी दाम्पत्ये नवसपूर्तीसाठी येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यापैकीच रवीकुमार हा एक पिता. त्याने सांगितले, की आम्हाला मूल होत नव्हते. म्हणून देवीकडे नवस केला होता. तिच्या कृपेने मूल झाले म्हणून आम्ही नवस फेडण्यासाठी येथे आलो आहोत.

या प्रकारात आतापर्यंत एकही मुलाला इजा झाली नसल्याचा पुरोहिताचा आणि भाविकांचा दावा आहे.

या मंदिरात तशी वर्षभर गर्दी असते. पण विशेषतः नवरात्रात ही गर्दी फारच वाढते.