शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 30 मे 2015 (11:41 IST)

बारा टोलनाके रविवारपासून बंद

महाराष्ट्र टोलमुक्त करण्याच्यादृष्टीने शासनाने आणखी एक पाऊल टाकले असून राज्यातील 12 टोलनाके 1 जूनपासून बंद होणार आहेत.
 
तर 53 पथकर स्थानकांवर कार, जीप व एसटी बसेसना टोलमधून सूट देण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली होती.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 11 टोलनाके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील एक टोलनाका असे एकूण 12 टोलनाके 1 जून 2015 पासून बंद करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित 27 टोलनाके व रस्ते विकास महामंडळाकडील 26 टोलनाके अशा एकूण 53 टोल नाक्यांवर कार, जीप व एसटी बसेसना सूट देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. या पथकर स्थानकांवर कार, जीप व एसटी बसेसना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र दोन मार्गिका ठेवण्यात याव्यात. त्याचप्रमाणे या वाहनांना पथकरात सूट असल्याचे फलक लावण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.