शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (10:03 IST)

मराठा समाजाच्या आंदोलना संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या वतीने होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार तसेच विविध पदाधिकारी यांना निमंत्रित करुन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. 
 
राज्यात या मोर्चांचे अतिशय शिस्तबध्दरितीने आयोजन करण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्रित झाले, तरी सुध्दा अतिशय शांततेने आणि ज्या प्रगल्भतेने हे मोर्चे झाले, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले. सध्या निघत असलेले हे मोर्चे मराठा समाजातील अनेक वर्षांच्या आक्रोशाचे प्रतिबिंब असून राज्य सरकारने या आक्रोशाची गंभीर दखल घेतली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांना संबोधित करताना सांगितले. हा आक्रोश दूर करण्यासाठी विविध स्तरावर संवाद प्रस्थापित करण्याचा मनोदयसुध्दा त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
 
बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या आणि आगामी काळात होऊ घातलेल्या मोर्चासंदर्भात तसेच समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य सरकार अतिशय सकारात्मक आहे. मात्र, राज्यातील जातीय तणाव वाढू न देता सामाजिक विषय संवादाने सुटावेत, यासाठी सरकारमधील विविध मंत्री, विविध राजकीय पक्षांचे खासदार - आमदार, ज्येष्ठ नेते, प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी, विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटना यांच्याशी येत्या काळात अधिक संवाद साधून प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.