शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अलिबाग , गुरूवार, 20 नोव्हेंबर 2014 (11:52 IST)

युटर्न: माझ्या वक्तव्याचा मीडियाकडून विपर्यास - शरद पवार

मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युटर्न घेतला आहे. तसेच भाजप सरकार पाडण्यामध्ये आपल्याला कुठलाही रस नसल्याचे पवार यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.
 
राज्यातील भाजप सरकारने चांगले काम केले नाही. जनहिताचे निर्णय न घेतल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षाप्रमाणे आम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराच्या समारोपाच्या भाषणात पवार बोलत होते. 
 
पवार म्हणाले, राज्यातील भाजप सरकारला आम्ही बाहेरून पाठिंबा दिला आहे, ही गोष्ट खरी आहे. माझी याबाबतची भूमिका स्पष्ट आहे. पाडापाडी करण्यामध्ये आम्हाला रस नाही. आग्रही भूमिका घेणे म्हणजे सरकार पाडणे नव्हे. आम्ही सरकार पाडायला निघालो, हा मी‍डियाच्या जावईशोध असल्याची टीका त्यांनी केली.
 
शरद पवार यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले.  'प्रॉडक्ट कसे आहे, हे अजून माहिती नाही, पण मार्केटिंग प्रभावी आहे. स्वतःची भूमिका एवढ्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणारा पंतप्रधान याआधी मी बघितला नाही, अशा शब्दात पवारांनी मोदी यांना लक्ष्य केले.