शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 15 सप्टेंबर 2015 (11:23 IST)

राहाणेची दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख रुपांची मदत

टीम इंडियाचा आधारस्तंभ म्हणून स्वत:ला सिद्ध करणारा आणि आपल्या विनम्र वागणुकीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकलेला मराठमोळा क्रिकेटवीर अजिंक्य राहाणेने आज आपल्यातील सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवून एक नवा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून, दुष्काळग्रस्तांच्या व्यथा-वेदना ओळखून या हळव्या तरुणाने बहुपयोगी जलयुक्त शिवार योजनेसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे.
 
आजीकडून प्रेरणा
 
संगमनेरमधील माझी 92 वर्षाची आजी आजही शेतात जाते. त्यामुळे दुष्काळी महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची स्थिती काय असेल, याची दाहकता मी समजू शकतो. म्हणून महाराष्ट्राचा एक नागरिक या नात्याने मी काही ना काही मदत देण्याचे ठरवले होते. त्याची आज पूर्तता केली, असे अजिंक्य राहाणेने सांगितले. 
 
माझी आजी आजही ती शेतात राबते. काकाही शेतात काम करतात. आजीकडूनच मदत करण्याची प्रेरणा मिळाली, असे अजिंक्य राहाणे याने सांगितले.