गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

खराब पंचगिरीमुळे सुवर्ण हुकले : अमित

WD
खराब पंचगिरीमुळे विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आपले सुवर्ण पदक हुकले अशी खंत रौप्यपदक विजेत्या अमित कुमारने व्यक्त केली. ५५ किलो गटात अंतिम फेरीत त्याची लढत इराणच्या हसन फरमान रहिमीविरूद्ध होती.

एशियन चॅम्पीयन अमितकुमार रहिमीविरूद्ध १-२ असा पराभूत झाला. बुडोपेस्ट, हंगरी येथे ही स्पर्धा पार पडली. तेथून फोनवर बोलताना १९ वर्षीय अमित म्हणाला, आपले सुवर्णपदक थोडक्यात हुकल्याची खंत वाटते. सुवर्ण हुकल्यामुळे दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारची बरोबरी साधण्याची संधीही हुकली. सुशीने २०१० च्या मॉस्को स्पर्धेत एकमेव सुवर्ण पटकावले होते. अमित म्हणाला, रहिमी विरूद्धची लढत चुरशीची झाली. बचावात्मक खेळ केल्याबद्दल पंचाने मला वॉर्निंग दिली होती. खरे तर इराणी मल्ल माझ्यापेक्षा अधिक बचावात्मक खेळ करत होता. त्यामुळे मला गुण मिळावयास हवा होता. पहिल्या फेरीत पहिला गुण मी घेतला आणि दोन वेळा रहिमीला जेरीस आणले. आमची १-१ अशी बरोबरी झाली. पुढच्या फेरीत पंचाने महत्त्वपूर्ण गुण रहिमीला बहाल केला. मी रहिमीवर हल्ला करत होतो तेव्हा पंचाने मलाच वॉर्निंग दिली. वास्तविक ही वॉर्निंग रहिमीला द्यायला हवी होती. कारण तो माझ्या चालींना प्रतिसाद देत नव्हता. रहिमीला गुण दिल्याने मी निराश झालो. तीन मिनिटांच्या दुस-या बाऊटमध्ये मीच अधिक आक्रमक होतो. २०१२ मध्ये एशियन अजिंक्यपद स्पर्धेत अमितने कांस्यपदक मिळवले होते. एकूण प्रकारावर कोच वीरेंद्र कुमार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अंतिम सामन्यात अमितचे प्रदर्शन अधिक परिणामकारक होते. त्यामुळे सुवर्ण पदकाचा तोच खरा हकदार होता. खराब पंचगिरीमुळे अमितचे सुवर्ण हुकले असले तरी ती देशाला त्याचा अभिमान आहे. अमितने उपान्त्य फेरीत टर्कीच्या टर्कीच्या सेझर अकगुलला ८-० असे, उपान्त्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या अलेस्मो एस्कोबेडोला ६-० तिस-या फेरीत फ्रान्सच्या झोहेर एलो अरॅक्यूला ८-० असे तर दुस-या फेरीत जपानच्या यासुहिरो इनिबाला १०-२ असे पराभूत केले होते. पहिल्या फेरीत त्याला बाय मिळाला होता. प्रत्येक बाऊटमध्ये सुशीलकुमार आणि ऑलिम्पिक कांस्य विजेत्या योगेश्वर दत्तने प्रोत्साहन दिल्याबद्दल अमितने त्यांचे आभार मानले आहेत. प्रत्येक फेरीत ते मला प्रोत्साहित करीत होते. उपान्त्य फेरी आधी मी माझी आई शीला देवीसमवेत बोललो होतो, असे अमित म्हणाला. अमित हा हरयाणातील सोनीपत जवळच्या नेहारी गावचा आहे. आता त्याचे लक्ष पुढील वर्षीच्या कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्सवर आहे. अमित हा ओएनजीसीमध्ये सेक्युरिटी इन्स्पेक्टर पदावर आहे.