शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

राफेल नादालने जिंकली यू.एस.ओपन

WD
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद स्पेनच्या रॅफेल नदालने पटकाविले. अंतिम फेरीत जगातील दोन अव्वल खेळाडू असलेल्या नदाल आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्यात लढत झाली आणि नदालने त्यामध्ये बाजी मारली. नदालच्या कारकिर्दीतील हे दुसरे यूएस ओपनचे विजेतेपद आहे, तर 13 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

नदाल-जोकोविच हे दोघेही कारकिर्दीत 37 वेळा, तर ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम फेरीत सहाव्यांदा आमनेसामने आले होते. नदालने 2010 मध्ये अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे त्याचा सध्याचा फॉर्म पाहता नदाललाच विजयाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत होते आणि तसेच झाले. नदालने जोकोविचचा 6-2, 3-6, 6-4, 6-1 असा पराभव केला. सात महिन्यांच्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर नदालने फेब्रुवारी महिन्यात पुनरागमन केले होते. त्यानंतरच्या मोसमातील हे नदालचे दहावे विजेतेपद असून, त्याने मोसमात 60 सामने जिंकले आहेत.

विजेतेपदानंतर बोलताना नदाल म्हणाला, की या विजेतेपदामुळे मी खूप भावनिक झालो आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना माहित आहे, की या विजेतेपदाचे मूल्य माझ्यासाठी काय आहे. जोकोविच चांगला खेळला. मला वाटलेच होते, की हा सामना चांगला होईल.