भारतीय पुरुष हॉकी संघासमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान; मलेशियाशी सामना होणार
भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा यशस्वी समारोप केला. आता पुरुष हॉकी संघाला सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. अंतिम सामन्यात पुरुष हॉकी संघाचा सामना मलेशियाशी होईल. हॉकीमध्ये आणखी एका सुवर्णपदकाची भारताला आशा असेल.
शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मलेशियाशी सामना करताना, भारतीय पुरुष हॉकी संघाला आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी आणि २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करण्यासाठी आपल्या चुकांमधून शिकून सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. भारतीय संघाने सलग दोन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कधीही सुवर्णपदके जिंकलेली नाहीत आणि भारतीय हॉकीच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिण्यासाठी शनिवारी हा पराक्रम करण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर, भारताला मलेशियाविरुद्ध त्याच चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल. पाकिस्तानविरुद्ध २३ व्या मिनिटापर्यंत तीन गोलची आघाडी घेतल्यानंतर, भारताने दुसऱ्या हाफमध्ये तीन गोल स्वीकारले आणि अंतिम शिट्टी वाजण्याच्या ४९ सेकंद आधी अभिषेकने केलेल्या गोलमुळे ४-३ असा विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
मलेशियाने दक्षिण कोरियाला २-१ ने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गेल्या तीन स्पर्धांपैकी दुसऱ्यांदा मलेशिया अंतिम फेरीत पोहोचला आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, "मलेशियाने चांगली कामगिरी केली आहे आणि हा सामना चांगला होईल. आम्ही मलेशियाविरुद्ध बऱ्याच काळापासून खेळलेलो नाही. दोन्ही संघ आक्रमकपणे खेळतात आणि खेळाडूंकडे कौशल्यासोबतच वेगही आहे. आम्हाला फक्त आमच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करायचे आहे."

