शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: सिडनी , सोमवार, 30 जून 2014 (10:37 IST)

ऑस्ट्रेलिन ओपन बॅडमिंटन; सायना नेहवालला विजेतेपद

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. तिचे हे यावर्षातील दुसरे विजेतेपद ठरले आहे.
 
सायनाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनची करोलिन मेरीन हिचा 21-18, 21-11 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. तत्पूर्वी सायनाने या स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत जगात दुसर्‍या स्थानावर असलेल्या चीनच्या शिजीन वांग हिच्यावर विजय मिळविला होता. त्यामुळे सायना हिच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा होती व तिने ती पूर्ण केली. 
 
पहिल्या गेममध्ये सायना आणि करोलिन यांच्यात चांगली लढत झाली. परंतु सायनाने तीन गुणफरकाने पहिला गेम घेतला. दुसर्‍या गेममध्ये करोलिन फारसा प्रतिकार करू शकली नाही. सायनाने दुसर्‍या गेमवर आपले पूर्ण वर्चस्व ठेवले व दुसरा गेम घेत विजेतेपद मिळविले. सायनाने यावर्षी नवी दिल्ली येथे खेळली गेलेली सईद मोदी ग्रांपी टुर्नामेंट जिंकली होती. 
 
हा अंतिम सामना 43 मिनिटे खेळला गेला. या विजेतेपदामुळे सायनाला साडे सात लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले. भारताच्या या फुलराणीने अंतिम   सामन्यात बहारदार खेळ केला. जगात ती अकराव्या स्थानावर आहे. 
 
यापूर्वी या दोघींची इंडोनेशिया ओपनमध्ये गाठ पडली होती. त्यावेळी सायनानेच बाजी मारली होती. कॅरोलिनने उपान्त्पूर्व फेरीत भारताच पी. व्ही. सिंधूवर मात केली होती. परंतु सायनाने तिचा विजयी रथ रोखून धरला. 24 वर्षाच्या सायनाने व्हॉलीजचा सुंदर खेळ केला. त्याचप्रमाणे नेटजवळ ड्रॉप्स टाकले तर उत्तम स्मॅशेसही तिने मारले. सायनाच्या प्रभावी खेळापुढे 21 वर्षाच्या मरिनचे फारसे चालू शकले नाही.