गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: हैदराबाद , गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (11:46 IST)

फेडररसोबत खेळण्यास सानिया मिर्झा उत्सुक

डब्ल्यूटीए स्पर्धेतील दुहेरीतील किताबावर आपली मोहर उमटवल्यानंतर आता इंटरनॅशनल प्रीमियम टेनिस लीग (आयपीटीएल) स्पर्धेत खेळण्यास भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा उत्सुक आहे. या स्पर्धेसाठी ती तयारी करत असून स्विझर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडररच्या संघात सानियाचा समावेश आहे. 
 
सानियाने पीटीआयशी बोलताना सांगितले की, टेनिसमधील अव्वल खेळाडू भारतात खेळत आहेत, ही या क्षेत्रासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ज्या संघात रॉजर फेडरर आहे त्याच संघात माझा समावेश आहे. त्यामुळे मी व्यक्तिश: खूप आनंदित आहे. मी या स्पर्धेत खेळायला अत्यंत उत्सुक आहे. या स्पर्धेचे स्वरूप चांगले आहे. क्रीडाप्रेमींना ही स्पर्धा आवडेल. आयपीटीएलमध्ये भारतासह चार फ्रॅँचायझी संघ खेळणार आहेत. या स्पर्धेत फे डररव्यतिरिक्त नोवाक जोकोविक, अँण्डी मरे आणि पीट सॅम्प्रस यांसारखे रथीमहारथी टेनिसपटूंचा समावेश आहे. सानिया म्हणाली, मी या वर्षी ग्रॅण्ड स्लॅम किताब पटकावला तसेच डब्ल्यूटीए विजेतेपदही जिंकले. यापुढे मी प्रथम क्रमांक पटकावण्याचा प्रयत्न करेन. पुढील वर्षी ही इच्छा पूर्ण होईल, अशी अपेक्षा करते. देशात टेनिसला चांगले भवितव्य दिसत आहे. अनेक युवा खेळाडू पुढे येत आहेत; पण या खेळाडूंना जागतिक पातळीवर अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी वेळ लागेल, असे सानिया म्हणाली.