शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (10:13 IST)

मकाऊ ओपन: सिंधूची हॅट्रिक

मकाऊ- दोन वेळच्या विजेत्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसर्‍यांदा मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिंधूने निर्णायक लढतीत जपानच्या मिनात्सु मितानी हिचा २१-९, २१-२३, २१-१४ असा पाडाव केला. 
 
सिंधूची सुरवात हॅटट्रिकसाठी सज्ज असलेल्या खेळाडूस साजेशी अशीच होती. पहिल्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस मोडीत काढताना सिंधूने दमदार सुरुवात केली. मात्र दुसर्‍या गेममध्ये मिटॅनीने खेळ उंचावला. त्यामुळे हा सेट चांगलाच रंगला. त्या मिटॅनी सरस ठरली. 
 
तिसर्‍या गेमपासून सिंधूने सुरवातीपासून आघाडी राखली. मितानीने पवित्रा बदलत क्रॉस कोर्ट रॅलीजवर भर दिला, तसेच नेटजवळही आक्रमकता दाखवली; पण सिंधूने तिला दाद दिली नाही. ब्रेकला असलेली ११-७ आघाडी भक्कम करताना तिने पुढील आठपैकी सहा गुण जिंकले. लाइनमनने चुकीचा निर्णय दिल्यानंतरही सिंधू शांत राहिली आणि तिने मितानीच्या चुकांचा फायदा घेत विजेतेपद पटकावले. 
 
या जेतेपदासह तिने एक लाख 20 हजार डॉलरचे घसघशीत इनाम मिळवले. यापूर्वी 2013 आणि 2014 मध्ये सिंधूने मकाऊ ओपन स्पर्धा जिंकली होती.