गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: कोलकाता , बुधवार, 14 ऑक्टोबर 2015 (11:14 IST)

मेस्सी जगातील सर्वात महान फुटबॉलपटू - पेले

गेल्या १० वर्षांच्या कालावधीत अर्जेंटिना संघाचा हूकूमी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा जगातील सर्वात महान फुटबॉलपटू असल्याचे वैयक्तिक मत ब्राझीलचे फुटबॉल सम्राट पेले यांनी व्यक्त केले आहे. 
 
फुटबॉल सम्राट पेले हे सध्या १० दिवसांच्या भारत दौ-यावर आले आहेत. जगातील अव्वल फुटबॉलपटूंची तुलना करणे खूपच अवघड असते. पण गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत जागतिक फुटबॉल क्षेत्रात अर्जेंटिनाचा मेस्सी हा सर्वोत्तम फुटबॉलपटू असल्याचे पेले यांनी येथे आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. ब्राझीलचा नेमार तसेच पोर्तुगालचा ख्रिस्टीयानो रोनाल्डो हेही तितक्याच दर्जाचे उत्तम फुटबॉलपटू आहेत. पोर्तुगालचा रोनाल्डो नेहमीच आघाडी फळीत खेळून गोल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण अर्जेंटिनाचा मेस्सी हा विविध ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवून वेगळे तंत्र अवलंबत गोल करण्यावर भर देत असतो. मेस्सीच्या फुटबॉल तंत्रामध्ये विविधता पाहावयास मिळते, असे पेले म्हणाले. 
 
७४ वर्षी पेले यांनी स्वत:च्या फुटबॉल कारकिर्दीमध्ये तीनवेळा ब्राझीलला फिफाचा विश्व करंडक मिळवून दिला आहे. अलिकडच्या कालावधीत फुटबॉल क्षेत्रातही स्पर्धा अधिक वाढली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सध्या या क्रीडाप्रकारात फुटबॉलपटूंना अस्तित्व राखणे कठीण जात आहे. ब्राझीलकडे सध्या नेमारसारखे दर्जेदार खेळाडू असल्याने ब्राझीलचे भवितव्य निश्तिच उज्ज्वल असल्याचे पेले म्हणाले. ब्राझील संघात गुणवंत फुटबॉलपटू आहेत, पण त्यांची वैयक्तिक कामगिरी चांगली होत असली तरी सांघिक कामगिरीबाबत ब्राझील संघासमोर समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.