बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: फुझो , सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 (10:41 IST)

सायनाला 'चायन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं' उपविजेतेपद

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला रविवारी चीन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. 
 
ऑलिम्पिक चॅम्पियन ली शुरेईने सायनाचा १२-२१, १५-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अंतिम फेरीचा हा सामना अजिबात रंगला नाही. अवघ्या ३९ मिनिटात सामन्याचा निकाल लागला. आपल्या खेळाने ली वर दबाव निर्माण करण्यात सायना अपयशी ठरली. उलट ली ने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. याआधी नऊ वेळा ली शुरेईने विविध स्पर्धांमध्ये सायनाला पराभूत केले आहे. 
 
जागतिक क्रमवारीत ली ७ व्या स्थानी आहे. यंदाच्या हंगामात सायनाने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सायनाने या मोसमात इंडिया ओपन सुपर सिरीज आणि ग्राँड पिक्स गोल्ड स्पर्धेचे जेतेपद मिळवले. त्यानंतर ऑल इंग्लंड आणि जागतिक स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 
 
फुलराणी सायनाने चीन ओपनमध्ये शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत तिने चीनच्या यिहान वांगचा ४१ मिनिटांत २१-१३, २१-१८ ने पराभव केला. 
 
सायना आणि यिहान यांच्यातील हा १३ वा सामना होता. त्यामध्ये सायनाने ४ तर वांगने ९ वेळा विजय मिळवला आहे. तर यंदाच्या वर्षी खेळण्यात आलेल्या तीन सामन्यात सायना विजयी झाली आहे. याआधी सायनाने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-१६, २१-१३ असे ४२ मिनिटांत सहज हरवत उपांत्य फेरीत आगेकूच केली.