बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विजय तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

बदलणार्‍या प्रवृत्ती हेच माझ्या नाटकाचं मूळ- तेंडूलकर

ND
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडूलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. बहुमुखी प्रतिभा असली तरी नाटककार म्हणून त्यांची मोठी आहे. ही ओळखही एवढी मोठी की भारतीय रंगभूमीचा इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. तेंडूलकरांच्या नाटकांत असं काय आहे, की त्यामुळे ते एवढे मोठे ठरतात? काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशीच बोलून जाणून घेतलंलं त्यांचं मोठेपण......

तेंडूलकर, तुम्ही म्हणता लिखाणासाठी आवश्यक पात्रता तुमच्यात नव्हती. मग असे असतानाही तुमच्यातून एक मोठा लेखक कसा निर्माण झाला?
शिक्षण आणि प्रशिक्षण हे बाहेरून मिळतं. पण माझ्या घरातलं वातावरण हे साहित्य आणि नाटकांशी संबंधितच होतं. माझे वडिल एक छोटीशी प्रकाशनसंस्था चालवायचे. घरात चिक्कार पुस्तकं पडलेली असायची आणि त्यांनीच मला वाचायला उद्युक्त केलं. माझे वडिल मला खूप नाटकंही पहायला घेऊन जायचे. त्या बालपणीच मला नाटकाची भूल पडली. मला आश्चर्य वाटायचं ते त्या काळात पुरूष स्त्री पार्टी व्हायचे आणि भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर मस्तपैकी विड्या ओढायचे. त्या सगळ्याची मला गंमत वाटायची.

तुम्ही लिहायला केव्हा सुरवात केली?
माझं सुरवातीचं लेखन अगदी स्वानंदासाठीच होतं. १९३० आणि ४० ही देशाच्या इतिहासातील अस्वस्थ दशकं होती. या अस्वस्थपणाची लागण मलाही झाली. म्हणूनच १९४२ च्या 'चले जाव' चळवळीत मीही सामील झालो होतो. त्यामुळे शाळेला दांड्याही मारल्या. मग कधी शाळेत गेलो की अपमानित व्हायची वेळही आली. या सगळ्या प्रकारामुळे काय चुकतं हे कळत नव्हतं. खूपच गोंधळलो होतो. त्यात मित्रही कमी. बोलायचोही कमी. मग माझ्या भावना व्यक्त करायला लेखन हेच एकमेव माध्यम होतं.

तुमच्या नाटकात सादरीकरणाबद्दल खूप बारीक बारीक सूचना असतात? तुम्ही दिग्दर्शकाच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करता असं वाटत नाही?
मी आजपर्यंत कुण्याही दिग्दर्शकाच्या कामात कधीही हस्तक्षेप केलेला नाही. मला माझ्या मनात जे असतं, ते व्यक्त करायचं असतं म्हणून ते बारकाईने लिहून काढण्याची माझी सवय आहे. पण ते सगळे सादर कसे करायचे त्यासाठी दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. अगदी हेच माझ्या चित्रपटांच्या पटकथेबाबतही असते.

घाशीराम कोतवाल किंवा सखाराम बाईंडर या नाटकांविषयी उद्भवलेल्या वादांविषयी आता काय वाटतं?
मला आता एवढंच वाटतं की त्यावेळी माझी भूमिका मांडायची संधी मला मिळायला हवी होती. पण विरोधकांनी फक्त माझ्याविरोधात आघाडीच उघडली. माझं लेखन हे नेहमीच प्रामाणिक होतं. मला जे कळत नाही, ते मी कधीच हाताळलं नाही. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. हे खरे आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेला शिवसेनेचा उदय आणि बाळ ठाकरे नावाच्या एका व्यंगचित्रकारातून निर्माण होत असलेला राजकीय नेता यांच्यावर घाशीराम आधारीत होते. पण माझ्या नाटकाचा केंद्रबिंदू हा माझ्या इतर नाटकांप्रमाणेच मानवी भावभावना, प्रवृत्ती हाच होता. या भावभावना, प्रवृत्ती एका रात्रीत कशा बदलतात, हेच मला दाखवायचे होते. वेगवेगळ्या थीम्सवर आधारीत मी जवळपास तीस नाटके लिहिलीत. त्यात अनेक प्रकारची व्यक्तिचित्रे आहेत. पण ज्यामुळे अकारण वाद निर्माण झाला अशाच नाटकांकडे बोट दाखविले जाते.

तुम्ही हल्ली मीडीयावर आपला राग व्यक्त करतांय? वास्तविक तुमच्या लेखनाची सुरवातही वर्तमानपत्रापासूनच झालीय. त्यानंतर तुम्ही नाटक, चित्रपट आणि टिव्हीकडे वळालात.

नाटकांच्या विशेषतः मराठी रंगभूमीवरील समांतर नाटकांच्या चळवळीबद्दल मी आशावादी आहे. कारण त्यात नवी तरूणाई अर्थपूर्ण प्रयोग करते आहे. पण टिव्हीने माझी निराशा केलीय. आणि केवळ पैशांसाठी पैशांवर चालणारी खासजी चॅनेल्स तर काय लोकांना पहायला आवडतं तेच दाखविणार हे मी समजू शकतो. पण अशा परिस्थितीत दूरदर्शन काय करतंय? वास्तविक बीबीसी व इतर काही सरकारी चॅनेल्सशी तुलना करतय तर दूरदर्शनची अवस्था हलाखाची आहे. आणि वर्तमानपत्रांचं काय? त्यांना तर खपाशी देणेघेणे आहे. किती आकडा वाढतोय तोच त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.

तुम्ही कधीच मुख्य प्रवाहातील चित्रपट लिहिला नाही. कारण?
नाही असे नाही. अशा चित्रपटांसाठीही मला बोलवले होते. अगदी राज कपूर, यश चोप्रा यांनीही माझी मनधरणी केली होती. पण माझ्या लक्षात आलं होतं, ते क्षेत्र माझ्यासाठी नाहीये. मुख्य धारेतील चित्रपटासाठी लेखक हा माशाला पकडण्यासाठी असलेल्या गळासारखा असतो. पण तरीही मी श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासाठी लिहिलं आणि त्याचा आनंदही घेतला. पण तरीही मला एकुणात असं वाटतं, की दोन माध्यमांच्या संगमात काम करण्याचं पुरेसं समाधान नाही.

पण मग नाटक हे सुद्धा तसंच माध्यम आहे. तुम्ही लिहिलेल्या शब्दांच्या बाबतीत दिग्दर्शक आणि अभिनेते काय करतील हे सांगता येत नाही.

होय. हे खरे आहे. पण तरीही नाटक ही वेगळी गोष्ट आहे. या माध्यमात मी अतिशय छान काम करू शकतो, असे मला वाटते. इथे लेखकाच्या शब्दांचा सन्मान राखला जातो. शिवाय दुसर्‍या प्रयोगात बदल करण्याची संधी यात माध्यमात आहे.