रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (13:48 IST)

दिल्ली दंगल प्रकरण : उमर खालिदला 'सूत्रधार' म्हणून अटक

दिल्ली दंगली प्रकरणी जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता आणि 'युनायडेट अगेंस्ट हेट'चा सह-संस्थापक उमर खालिदला अटक करण्यात आली आहे.
 
युनायडेट अगेंस्ट हेटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 11 तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणात "सूत्रधार" म्हणून अटक केली आहे.
 
यूनायडेट अगेंस्ट हेट संस्थेचे वकील तमन्ना पंकज यांनी उमर खालिदला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील एफआयर 59 मध्ये यूएपीए अंतर्गत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
 
उमर खालिदचे वडील सैयद कासिम रसूल इलियास यांनी सांगितले, "माझा मुलगा उमर खालिद याला स्पेशल सेलने रात्री 11 वाजता अटक केली. दुपारी 1 वाजल्यापासून पोलीस त्याची चौकशी करत होते. त्याला दिल्ली दंगल प्रकरणात अडकवलं जात आहे."
 
युनायटेड अगेंस्ट हेटने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली दंगली प्रकरणाच्या आडून दिल्ली पोलीस आंदोलकांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, "भीती दाखवण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले गेले तरी सीएए आणि यूएपीएसारख्या क्रूर कायद्यांविरोधातलढाई सुरू राहिल."
 
दिल्ली पोलीसांनी उमर खालीदच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे.
 
उमर खालिदला अनेकांचे समर्थन
उमर खालिदच्या अटकेनंतर अनेकांनी त्याचे समर्थन करत त्याच्या अटकेचा विरोध केला आहे.
 
काही काळातच ट्विटरवर #standwithumarkhalid हा ट्रेंड सुरू झाला. या अंतर्गत हजारो ट्विट्स करण्यात आले आहेत.
 
अपूर्वानंद आणि हर्ष मंदर यांसारख्या 12 जणांनी एकत्र येऊन उमर खालिदच्या अटके प्रकरणी निषेध नोंदवला. उमर देशातील धाडसी युवकांचा आवाज असल्याचं सांगत त्याच्यासारखे युवक "देशाच्या घटनात्मक मूल्यांसाठी आवाज उठवतात," असंही ते म्हणाले.
 
त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, "सीएएविरोधी शांततापूर्ण आंदोलकांना लक्ष्य करत करण्यात आलेली ही चौकशी दुर्देवी आहे. या हेतूनेच उमर खालिदला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यूएपीए, देशद्रोह आणि कट यांसह अनेक गुन्हे दाखल आहेत. ही चौकशी फेब्रुवारी 2020 मध्ये देशाच्या राजधानीत झालेल्या हिंसाचाराबद्दल नसून असंवैधानिक सीएएविरुद्ध देशभरात शांततेत आणि लोकशाही पद्धतीने झालेल्या आंदोलना विरोधात आहे, याबाबत आम्हाला काहीही शंका नाही. उमर खालिद देशभरात सीएएविरोधी आंदोलनात संविधानाच्या बाजूने बोलणाऱ्या हजारो आवाजांपैकी एक आहे. विशेषतः शांततामय, अहिंसक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांपैकी एक आहे."
 
या निवेदनात असंही म्हटले आहे की, "दिल्ली पोलीसांनी उमर खालिदला हिंसा प्रकरणातील सूत्रधार म्हणून अनेक गंभीर प्रकरणांमध्ये अडकवण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. महत्त्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेल्या 20 जणांपैकी 19 जण 31 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यापैकी 17 जणांना यूएपीए अंतर्गत कठोर कलमांखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली दंगली प्रकरणात कट रचल्याप्रकरणी त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने दंगल भडकवली आणि हिंसेत ज्यांचा सहभाग आहे त्यांना स्पर्शही करण्यात आलेला नाही. ताब्यात घेतलेल्यांपैकी एक वगळता पाच महिला आणि इतर सर्व विद्यार्थी आहेत. उमर खालिद आणि इतर तरुण कार्यकर्त्यांच्या अटकेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो."