शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 6 एप्रिल 2021 (15:07 IST)

न्या. नुथालपकी वेंकट रामण्णा यांची सुप्रीम कोर्टाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून निवड

सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. नुथालपकी वेंकट रामण्णा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
 
घटनेच्या कलम 124 (2) ने दिलेल्या अधिकाराअंतर्गत भारताचे राष्ट्रपती रामथान कोविंद यांनी न्या. नुथालपकी वेंकट रामण्णा सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक केली आहे.
 
न्या. रामण्णा भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहातील. ते 24 एप्रिल 2021 पासून आपल्या पदाची सुत्रं हातात घेतील.
न्या. रामण्णा एका शेतकरी कुटुंबातून येतात आणि त्यांच्या घरातले पहिले वकील आहे. ते मूळचे आंध्र प्रदेशमधल्या कृष्णा जिल्ह्यातल्या पोन्नावरम गावचे आहेत. त्यांना साहित्यात आणि कर्नाटकी संगीतात खूप रस आहे.
 
1983 मध्ये त्यांनी वकिलीला सुरूवात केली. त्यांनी आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात, सेंट्रल आणि आंध्र प्रदेश प्रशासकीय प्राधिकरणात तसंच भारताच्या सुप्रीम कोर्टाच प्रॅक्टीस केलेली आहे.
 
राज्यघटना, दिवाणी, कामगार, सेवा आणि निवडणुकीसंदर्भातल्या कायद्यांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आंतरराज्यीय नदी प्राधिकरणासमोरच्या प्रकरणातही त्यांनी वकिली केली आहे.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सरकारी संस्थांसाठी वकील म्हणून काम पाहिलेलं आहे. यात रेल्वे, आंध्र प्रदेशचं केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण अशा संस्थांचा समावेश होतो. त्यांनी आंध्र प्रदेशसाठी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही काम पाहिलेलं आहे.
 
न्या. रामण्णा 2014 पासून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून काम पाहात आहेत. मार्च 2019 ते नोव्हेंबर 2019 या काळात त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या लीगल कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथोरिटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते 2019 पासून काम पाहात आहेत.
सुरुवातीला त्यांची नेमणूक आंध्र प्रदेश हायकोर्टात कायमचे न्यायमूर्ती म्हणून झाली होती. त्यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणूनही 2013 साली काम पाहिलेलं आहे.
 
वकिली सुरू करण्यापूर्वी काही काळ त्यांनी एका तेलुगू वृत्तपत्रातही काम केले होते.
 
सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे 23 एप्रिल 2021 निवृत्त होत आहेत. त्यानंतर रामण्णा हे सरन्यायाधीश बनतील.