शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (20:13 IST)

नाना पटोलेंचे वक्तव्य 'मी मोदींना मारू शकतो,' हे नेमके कुणासाठी?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडलीय. 'मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,' असं विधान असलेला व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
नानांचं स्पष्टीकरण, काँग्रेसची बाजू आणि भाजपची टीका, या सर्व गोष्टी आपण पाहूच. त्यापूर्वी नाना पटोलेंचा जो व्हीडिओ व्हायरल होतोय, त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहू.
 
नाना पटोले म्हणालेत की, "मी 30 वर्षांच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही घेतली. लोकांना वाटतो. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मोदीला मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आला. मी एक प्रामाणिक लीडरशिप तुमच्याकडे आहे. तर विरोध दर्शवत आहेत."
 
नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यात हे वक्तव्य केलंय. भंडाऱ्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं वाहतंय.
 
बीबीसी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा काल (16 जानेवारी) शेवटचा दिवस होता. त्यामुळे नाना पटोले यांनी विविध गावांमध्ये सभा घेतल्या. त्याचरम्यान एका गावामध्ये स्थानिक गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
 
नानांच्या या वक्तव्यानंतर स्थानिक भाजपसह महाराष्ट्र भाजपमधील नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजपचे भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात जाऊन नानांविरोधात तक्रार दाखल केली.
 
तसंच, खासदार सुनील मेंढे म्हणाले की, "जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाना पटोलेंनी बेताल वक्तव्य केलंय. त्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. नानाला ही सवयच आहे की, आमच्याविषयी तोंडाला येईल ते बोलावं आणि प्रसिद्धी मिळवावी.
 
"पण आम्ही कदापी सहन करणार नाही. त्यांच्यावर प्रत्येक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करू आणि त्यांना त्यांची जागाही दाखवून देऊ. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल."
 
महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, "काँग्रेसचे नाना पटोले यांना 'समुपदेशना'ची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी यांचा मोदीद्वेष नवा नाही. या द्वेषापोटी आपण काय बोलतो आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही.
 
"मा. मोदींजीच्या विरोधात वारंवार गरळ ओकल्याने आपल्याला राहुल गांधी 'बक्षिसी' देतील या समजापोटी ते वारंवार बेताल होऊ लागले आहेत," उपाध्ये म्हणाले.
 
"आज नानाजी जे काही बोलले आहेत ते पाहता त्यांच्या 'समुपदेशना'ची गरज आहे असं दिसतं आहे. यापेक्षा त्यांच्या वक्तव्यावर वेगळ्या मार्गाने व्यक्त होता येणे अवघड आहे," असंही उपाध्ये म्हणाले.
 
भाजपकडून टीका सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नाना पटोलेंची बाजू मांडलीय, तर स्वत: नाना पटोले यांनी पुढे येत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
 
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, "गावगुंडांपासून लोकांचं संरक्षण करणं हा काही गुन्हा आहे का? नाना पटोले हे कुठे भाषण देत नव्हते, ते लोकांच्या गराड्यात होते, लोकांच्या तक्रारी ऐकत होते. भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला गावगुंड आहे. त्याविषयी ते बोलत होते. मारणं, शिव्या देणं ही काँग्रेसची संस्कृती नाही, ही भाजपची संस्कृती आहे."
 
तर नाना पटोले यांनी ट्वीट करून म्हटलंय की, "माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता, मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हीडिओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे."
 
"मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही, तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो," असंही नाना पटोले म्हणाले.