शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (11:22 IST)

पारशी नववर्ष : या पारशी बांधवांनी भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य बदललं..

आज 16 ऑगस्ट. आजच्या दिवशी देशात सर्वत्र पारशी नववर्षारंभ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने पारशी संस्कृती आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींची सर्वत्र चर्चा आहे.
 
पारशी संस्कृतीमध्ये झोराष्ट्रीयन कॅलेंडरनुसार कालगणना होते. त्यानुसार, 15 ऑगस्ट रोजी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच पतेति सण साजरा करण्यात येईल. तर पुढचा दिवस म्हणजेच 16 ऑगस्ट हा दिवस पारसी नूतन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाने पारशी कॅलेंडरमधील पहिला महिना फरवर्दीन या महिन्याची सुरुवात होते.
 
पारशी समुदाय हा भारतातील अल्पसंख्याक समुदायांपैकी एक मानला जातो. भारतीय इतिहासात पारशी समुदायाला एक विशिष्ट असं स्थान आहे. या समाजातून अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वं उदयाला आली. या व्यक्तींनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे.
 
आज पारशी नववर्षानिमित्त भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य बदलणाऱ्या काही पारशी बांधवांची माहिती आपण घेऊ -
 
पारशी भारतात कसे आले?
पारशी समुदायाविषयी जाणून घेण्याआधी सर्वप्रथम आपण त्यांच्या इतिहासाकडे एक नजर टाकूया. पारशी समुदाय हा मूळचा इराणमधील पोरस प्रांतातील रहिवासी होता. याठिकाणचे ते राज्यकर्तेही होते.
 
पण अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ पारशी समुदायावर आली होती. यानंतर जीव मुठीत धरून पारशी बांधव भारताच्या दिशेने निघाले.
 
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यातील दुर्गम अशा ठिकाणी एक गाव आहे उदवाडा. या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी 1200 वर्षांपूर्वी आपलं पहिलं पाऊल ठेवलं.
 
याबाबत एक कथा पारशी इतिहासात प्रसिद्ध आहे. गुजरातच्या संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोक जहाजातून उतरले. याठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी स्थानिक राजे जाधव राणा हेसुद्धा उपस्थित होता. पारशी समाजाच्या नेत्याने राजांना भारतात प्रवेश करून वास्तव्य करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी भाषेच्या अडथळ्यामुळे दोघांमधील संवाद योग्यरित्या होऊ शकला नाही. पण पारशी बांधवांचं म्हणणं त्यांच्या लक्षात आलं.
 
या भूमीवर आधीपासूनच लोक वास्तव्याला आहेत. त्यामुळे तुम्हाला कसे सामावून घेणार, असा प्रश्न जाधव राणा यांना विचारायचा होता. त्यासाठी सांकेतिक पद्धतीने जाधव राणा यांनी एका पेल्यात काठोकाठ दूध भरून त्यांच्याकडे पाठवून दिलं. राणा यांचं म्हणणं लक्षात आल्यानंतर पारशी समाजातील नेत्याने या दूधात एक चिमूटभर साखर मिसळून दिली.
 
याचा अर्थ दूधात साखर जशी मिसळून दुधाचं चव वाढवते, तसे आम्ही भारतीय समाजात एकरूप होऊन जाऊ, हा संदेश पारशी नेत्याने जाधव राणा यांना दिला. पारशी नेत्याची ही कृती राजे जाधव राणा यांना खूप आवडली. त्यांनी पारशी समुदायाला तत्काळ अभय देण्याचा निर्णय घेतला.
 
याच परिसरात उदवाडा येथे पारशी समुदायाने त्यांचं देशातील पहिलं अग्नी मंदिर बांधलं. यानंतर भारताच्या विविध भागात पारशी बांधव पसरले. जाधव राणा यांना वचन दिल्याप्रमाणे पारशी बांधव भारतीय समाजात मिसळून गेले. पुढे पारशी समुदायाने आपल्या कर्तृत्वाने भारतीय समाजाच्या प्रगतीत उल्लेखनीय असं योगदान दिलं.
 
भारतीय इतिहासात उल्लेखनीय योगदान देणारे पारशी बांधव -
1. टाटा कुटुंबीय
 
भारतीय इतिहासात टाटा कुटुंबाचं योगदान प्रचंड मोठं आहे. सध्या टाटा समूहाची गणना देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये केली जाते. याच टाटा समूहाची पायाभरणी जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांना भारतीय उद्योगजगताचे जनक म्हणून ओळखलं जातं.
 
3 मार्च 1839 रोजी जन्मलेल्या जमशेदजी टाटा यांनी कमी वयातच आपल्या कल्पकतेची चुणूक सर्वांना दाखवली. त्यांनी त्यांचे औद्योगिक संबंध इंग्लंड, अमेरिका, चीन तसंच जपान या देशांमध्ये प्रस्थापित केले.
 
सुरुवातीला लोह आणि स्टील उद्योगांपासून सुरुवात करत ते हॉटेल व्यवसायातही उतरले. त्यांच्याच कार्यकाळात मुंबईच्या कुलाबा भागात ताज महाल हॉटेल सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी देशातील हॉटेलांपैकी केवळ ताज हॉटेलमध्येच वीज उपलब्ध होती, असं सांगितलं जातं.
 
जमशेदजी टाटा यांनी निवडलेल्या मार्गावरच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तंनी मार्गक्रमण केलं. JRD टाटा म्हणजेच जहाँगीर रतनजी दादाभाई टाटा यांनी टाटा समूहाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. JRD टाटा हे देशातील पहिले परवानाधारक पायलट होते.
 
त्यांनी पुढे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा-टी आणि व्होल्टास या कंपन्यांचं जाळं उभं केलं. तसंच भारताची पहिली विमान कंपनी टाटा एअरलाईन्सची स्थापनाही त्यांनीच केली होती. स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी भारत सरकारने आपल्या अखत्यारित केली होती.
 
टाटा समूहाच्या स्वरूपात मोठा वारसा लाभलेल्या रतन टाटा यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनंच केलं. रतन टाटा हे 1991 ते 2012 अशी सुमारे 19 वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष होते.
 
त्यांच्या काळात टाटा कंपनीचा नफा 40 पटींनी वाढला. रतन टाटा यांनी आपला वारसदार म्हणून शापूरजी पालोनजी मिस्त्री यांचे सर्वात लहान चिरंजीव सायरस मिस्त्री यांना नेमलं होतं. पण त्यांच्यात वाद झाल्यानंतर सायरस यांना आपल्या पदावरून बाजूला व्हावं लागलं होतं.
 
2. होमी जहाँगीर भाभा
भारताच्या अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉ. होमी जहाँगीर भाभा यांना ओळखलं जातं. भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सधन पारसी कुटुंबात झाला होता. त्यांनी 1945 मध्ये आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) संस्थेची स्थापना केली होती.
 
1947 ला भारत सरकारने स्थापन केलेल्या आण्विक ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्षही ते होते. ते सुमारे 15 वर्षं या आयोगाचे अध्यक्ष होते. यादरम्यान भाभा यांना पाचवेळा भौतिकशास्त्र विषयात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
 
भारताचे दिग्गज शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण आपल्या शास्त्रज्ञ मित्रांचं कौतुक करण्यात जास्त पुढे दिसून येत नसत. पण होमी जहाँगीर भाभा यांचं कौतुक करताना ते मागेपुढे पाहायचे नाहीत. होमी जहाँगीर भाभा यांना ते भारताचा लिओनार्दो द विंची संबोधत असत.
 
नेहमी डबल ब्रेस्ट सूट परिधान करणारे होमी भाभा यांना विज्ञानासोबतच संगीत, नृत्य, पुस्तकं आणि चित्रकलेत रस होता. आपल्या शास्त्रज्ञ मित्रांचं भाषण देताना ते चक्क त्यांची चित्रं काढत असत. अखेर एका विमान अपघातात 1966 साली होमी जहाँगीर भाभा यांचं निधन झालं.
 
3. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
भारताच्या लष्करी इतिहासातील उल्लेखनीय अधिकाऱ्यांमध्ये सॅम माणेकशॉ यांचा समावेश होतो. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या 1971 च्या युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारताचे लष्करप्रमुख होते.
 
आपल्या तब्बल 40 वर्षांच्या लांबलचक लष्करी कारकिर्दीतील 5 वर्षे ते भारताचे लष्करप्रमुख राहिले. इतकंच नव्हे तर सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सैन्याकडून त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही सहभाग नोंदवला होता.
 
 
सॅम माणेकशॉ यांचं पूर्ण नाव सॅम होरमूमजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ होतं. पण क्वचितच कुणी त्यांना त्यांच्या पूर्ण नावाने बोलावलं असेल. ते पंजाबमधील एका लष्करी अधिकाऱ्याच्याच घरी जन्माला आले. त्यांच्या वडिलांनी लष्करी अधिकारी म्हणून पहिल्या महायुद्धात ब्रिटिश लष्करात सेवा दिली होती.
 
1931 च्या इंडियन मिलिटरी अॅकेडमीच्या पहिल्या बॅचमधून सॅम माणेकशॉ लष्करी सेवेत दाखल झाले होते. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1942 दरम्यान दुसऱ्या महायुद्धात. यावेळी बर्मा येथे एका मोहिमेवर असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्यावर जपानी सैन्यातील एका सैनिकाने गोळीबार केला होता. मशीननमधून झाडलेल्या सात गोळ्या सॅम यांच्या पोटात, आतड्यात घुसल्या.
 
पण या हल्ल्यातून सॅम हे चमत्कारिकरित्या बचावले. त्यानंतर 1946 साली त्यांना दिल्ली येथे लष्कराच्या मुख्यालयात नेमणूक देण्यात आली. 1948 साली व्ही. पी. मेनन हे काश्मिरचं भारतात विलिनीकरण करण्यासाठी महाराजा हरिसिंह यांना भेटण्यास गेले होते, त्यावेळी सॅम माणेकशॉ हेच त्यांच्यासोबत होते.
 
1962 साली चीनविरुद्ध युदधात पराभव पत्करावा लागल्यानंतर बी. जी. कौल यांच्याठिकाणी सॅम यांच्याकडे चौथ्या तुकडीची कमान सोपवण्यात आली होती.
 
4. अर्दशिर गोदरेज
अर्देशिर गोदरेज हे अत्यंत खटपट्या स्वभावाचे उद्योजक होते. आपल्या किशोरवयापासूनच त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. पण त्यांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही. अखेर, 1897 साली कुलुपाच्या उद्योगात त्यांना यशाची चावी मिळाली.
 
तेव्हापासून कधी आंघोळीचा साबण, फर्निचर, फ्रिज अशा अनेक उद्योगांमध्ये गोदरेज कंपनीने हात आजमावला. सध्या प्रॉपर्टी व्यवसायातही गोदरेज कंपनीचं नाव आघाडीवर आहे.
 
अर्देशिर गोदरेज हे मुळात व्यवसायाने वकील होते. पण त्यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. अनेक व्यवसायांमध्ये अपयश येऊनही त्यांचा धीर खचला नाही. सध्या गोदरेजचे 1.1 अब्ज ग्राहक विविध क्षेत्रात आहेत. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांचं उत्पन्न 4 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षाही जास्त आहे.
 
5. पॉली उम्रीगर
भारताच्या क्रिकेट इतिहासात पॉली उम्रीगर यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचं पूर्ण नाव पहलानजी रतनजी उम्रीगर. 1940-50 च्या दशकात पॉली उम्रिगर यांना क्रिकेटमध्ये बिग हिटर म्हणून ओळखलं जायचं. विशेषतः छक्का मारून शतक मारण्याची किमया त्यांनी त्यावेळी दोनवेळा करून दाखवली होती. भारताने पहिल्यांदा इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी विजय मिळवला, त्या सामन्यात पॉली उम्रीगर यांनी नाबाद 130 धावा बनवल्या होत्या
 
पॉली उम्रीगर यांनी भारतासाठी 59 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 8 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी कर्णधारपदही भूषवलं. इतकंच नव्हे तर एखाद्या भारतीय खेळाडूने पहिल्यांदा बनवलेलं द्विशतकही पॉली उम्रीगर यांनीच केलं होतं.
 
1978-82 दरम्यान पॉली उम्रिगर निवड समितीचे अध्यक्ष, संघ व्यवस्थापक आणि बीसीसीआयचे कार्यकारी सचिवही बनले. त्यांना प्रतिष्ठित सी. के. नायडू पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. आजही पॉली उम्रीगर यांच्या नावे बीसीसीआयकडून सर्वश्रेष्ठ भारतीय क्रिकेटपटू हा पुरस्कार देण्यात येतो. 28 मार्च 1926 ला जन्मलेल्या उम्रिगर यांचं निधन 7 नोव्हेंबर 2006 रोजी झालं.
 
6. दादाभाई नौरोजी
दादाभाई नौरोजी (1825-1917) ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे पहिले आशियाई नेते होते. पण त्यांची ओळख एवढीच नाही. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.
 
आज जगभरात विविध संकटांनी डोकं वर काढलेलं असताना नौरोजींच्या कार्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. आपल्या प्रगतिशील राजकीय इच्छाशक्तीमुळे दादाभाईंचं आयुष्य इतिहासातल्या काळ्या पर्वातही आशेचा किरण होता.
 
दादाभाईंचा जन्म मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात झाला. फ्री-पब्लिक स्कूलिंग योजनेअंतर्गत त्यांचं शिक्षण झालं. लोकांची सेवा करणं हेच सार्वजनिक शिक्षणाच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असं त्यांना वाटायचं.
 
लहान वयातच प्रागैतिक विचारांनी त्यांना आकर्षित केलं. 1840 मध्ये दादाभाईंनी मुलींसाठी शाळा उघडली. कर्मठ पारंपरिक विचारसरणीच्या पुरुषांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वत:ची भूमिका योग्य पद्धतीने मांडण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. काळाच्या पुढचा विचार करणारं द्रष्टेपण त्यांच्या अंगी होतं.
 
पाच वर्षातच मुंबईतली ही मुलींची शाळा विद्यार्थ्यांनी गजबजली. यामुळे दादाभाईंच्या विचारांना प्रोत्साहनच मिळालं. त्यांनी लैंगिक समानतेचा मुद्दा मांडला. महिलांना या जगात खुलेपणाने जगण्याचा, आपल्या विचारानुसार कृती करण्याचा, अधिकार आणि कर्तव्यं निभावण्याचा समान अधिकार आहे, असं दादाभाईंनी त्यावेळी म्हटलं होतं. दादाभाईंच्या प्रयत्नामुळेच मुलींच्या/महिलांच्या शिक्षणाप्रति देशातील लोकांचा असलेला दृष्टिकोन बदलला.
 
पुढे दादाभाई लंडनला गेले. भारतात तात्काळ सुधारणांची गरज आहे, हे ब्रिटनमधल्या मोठ्या वर्गाला पटवून देण्यात दादाभाई यशस्वी झाले. महिलांना मतदानाचा अधिकार, कामगारांना आठ तास काम करण्याचा नियम, अशा सुधारणांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.
 
त्यांना कामगारांचं, त्यांच्या नेत्यांचं, कृषी क्षेत्रातील धुरीण, महिला चळवळ तसंच चर्चमधील पाद्री लोकांचा पाठिंबा मिळाला. ब्रिटनच्या संसदेत निवडून जाण्यासाठी जितकी मतं लागतात, अगदी तेवढ्याच लोकांपर्यंत दादाभाईंना पोहोचण्यात यश आलं. 1892 मध्ये दादाभाई लंडनमधल्या सेंट्रल फिन्सबरी इथून अवघ्या पाच मतांनी निवडून आले.
 
7. सायरस आणि आदर पुनावाला
 
सायरस पुनावाला यांना आपण सिरम इन्सिट्युटचे संस्थापक म्हणून ओळखतो परंतु सिरमच्या आधी त्यांना स्पोर्ट्स कार तयार करायच्या होत्या. 'कुमी कपूर' यांनी लिहिलेल्या 'द टाटाज, फ्रेडी मरक्युरी अॅण्ड ऑदर बावाज' या पुस्तकात सायरस पूनावाला यांच्या या प्रवासाबाबत सांगण्यात आलंय.
 
सायरस पुनावाला यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पोर्ट्स कार तयार करायचे ठरवले होते. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या शालेय मित्रांसोबत एका स्पोर्ट कारचं मॉडेल तयार केलं. परंतु त्याला व्यावसायिक स्वरूप देणं त्यांना त्यावेळी शक्य नव्हतं. त्यामुळे ती कल्पना त्यांनी रद्द केली.
 
त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की भारतातील श्रीमंत लोकांसाठी एखादी गोष्ट तयार करण्यापेक्षा भारतातील सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाची वस्तू आपण तयार करायला हवी आणि त्यातूनच पुढे सिरम इंन्स्टिट्यूटची स्थापना सायरस पूनावाला यांनी केली.
 
सायरस पुनावाला यांना उद्योग क्षेत्रामधील त्यांच्या कामगिरीबाबात पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. यापूर्वी 2005 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सिरम इंन्स्टिट्युटची सुरुवात सायरस पुनावाला यांनी केली होती. सिरम सध्या जगातील सर्वाधिक लशींचे डोस निर्माण करणारी कंपनी आहे. कोरोनावरील कोव्हिशिल्ड ही लस सिरममध्येच तयार करण्यात आली आहे.
 
पुनावालांचं कुटुंब ब्रिटिशांच्या काळात 19 व्या शतकात पुण्यामध्ये आलं असं म्हटलं जातं. अनेक पारसी कुटुंबं ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये त्यांच्यासोबतच प्रशासनात, व्यापारात जवळकीचे संबंध प्रस्थापित करत स्थिर झाली. ज्या भागात ते स्थिर झाले तिथली नावं या कुटुंबांनी घेतली असंही आपल्याला दिसतं.
 
अशाच प्रकारे या कुटुंबाला 'पूनावाला' म्हटलं जाऊन ते ब्रिटिशकाळात 'पुणेकर' झाले. स्वातंत्र्यपूर्वकाळात बांधकाम व्यवसायात या उद्यमी कुटुंबानं जम बसवला होता. पण त्याहीपेक्षा त्यांची ओळख निर्माण झाली आणि आजही आहे ते घोड्यांच्या व्यापारानं, ती सुरुवात केली अदार यांचे आजोबा सोली पुनावालांनी.
 
त्यांनी पूनावाला स्टड फार्म्स सुरू केलं, उत्तम शर्यतींच्या घोड्यांची पैदास सुरू केली आणि लवकरच पुनावालांचं नाव घोड्यांच्या व्यापाराशी जोडलं गेलं. राजे, ब्रिटिश अधिकारी, उद्योगपती असा सगळा 'एलिट' वर्ग घोड्यांच्या शर्यतीशी जोडला गेला होता. त्यामध्ये जम बसवून पुनावालांच्या साम्राज्याची पायाभरणी झाली.
 
8. फली नरिमन
कायदा क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे फली सॅम नरिमन होय. फली नरिमन यांनी सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील म्हणून 1971 पासून काम सुरू केलं. तेव्हापासून त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये बाजू मांडण्याचं काम केलं. 1991 ते 2010 या काळात फली नरिमन हे बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते.
 
फली यांचा जन्म 1929 साली म्यानमारच्या रंगून येथे सॅम बारियामजी नरिमन आणि बानू नरिमन यांच्या पोटी झाला. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण सिमल्यात तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत पूर्ण केलं.
 
यानंतर मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला ते मुंबई हायकोर्टात वकिली करायचे. याठिकाणी 22 वर्षे वकिली केल्यानंतर त्यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील म्हणून करण्यात आली होती.
 
फली यांना 1991 साली पद्मभूषण तर 2007 साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. शिवाय ते 1999 ते 2005 या काळात ते राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा खासदारही होते.
 
केवळ यादीतील वरील व्यक्तींनीच नव्हे तर इतरही अनेक पारशी बांधवांनी भारतीय इतिहासात आपलं योगदान दिलं आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्या कार्यातून भारताच्या प्रगतीत हातभार लावला. त्यांनी सुरु केलेल्या कामाचा वारसा जपत हे काम आजही तितक्याच जोमाने सुरू आहे, हे विशेष.