शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (08:54 IST)

एकनाथ शिंदे दसरा मेळावा: शिंदेंच्या सभेचा राजकीय अर्थ काय?

eknath shinde
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आज ( 05 ऑक्टोबर) पार पडला. दोन्ही शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोन स्वतंत्र्य सभा झाल्या. उद्धव ठाकरेंची सभा शिवाजी पार्क मैदानावर झाली आणि एकनाथ शिंदे यांची सभा बीकेसी मैदानावर झाली.
 
दोन्ही सभेला तुफान गर्दी होती आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढले, टीका केली आणि तोफ डागली.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, कट करणारा म्हणजेच कटअप्पा तर एकनाथ शिंदे त्यांना उत्तर देताना म्हणाले कटप्पा दुटप्पी तरी नव्हता. दोन्ही बाजूंनी दावे झाले की त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना गद्दार म्हटलं गेलं.
 
मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बंडानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता. त्यामुळे ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष होते आणि त्यांच्या भाषणाचा नेमका काय अर्थ काय याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
 
एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी संपर्क साधला.
 
देसाई सांगतात, "उद्धव ठाकरेंचे भाषण उत्तम झाले. त्यांनी योग्य वेळ साधली. नेहमीच्या गोष्टी ते तर बोललेच पण त्याबरोबर ते आरएसएस नेते दत्तात्रय होसबाळे यांच्यावर बोलले, सरसंघचालकांवर बोलले. पण एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे भाषण संपेपर्यंत आपले भाषण सुरू केले नाही."
 
जयदेव ठाकरे यांना सभेला निमंत्रण
"उद्धव यांचे भाषण संपण्यासाठी थोडा अवधी बाकी असताना ते उठले त्यात त्यांनी नमस्कार केला त्यातही त्यांनी वेळ घेतला आणि उद्धव यांना प्रत्युत्तर दिले. हा नियोजनाचा भाग असू शकतो," देसाई सांगतात.
 
एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची बहिण अरुणा गडकरी यांना बोलवलं होतं, तसेच जयदेव ठाकरे आणि चंपासिंह थापा यांना बोलवलं होतं. जयदेव ठाकरे म्हणाले की एकनाथ यांना एकटं पडू देऊ नका.
 
याबाबत देसाई म्हणतात, "की जयदेव आणि एकनाथ यांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत का याबाबत फारसं कुणाला माहीत नाही पण शिंदे हे प्रयत्न जरूर करतील की ते एकटे नाहीत. त्यांच्यासोबत ठाकरे कुटुंबातील लोक आहेत. पण यातही थोडा विरोधीभास वाटतो कारण एका बाजूला ते म्हणतात की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहोत त्याचवेळी ते ठाकरे कुटुंबातील लोकांचा आधारही घेताना दिसत आहे. हा एक विरोधाभास आहे."
 
"जयदेव यांना राजकारणात किती महत्त्व द्यावं किंवा गांभीर्याने घ्यावं हा देखील प्रश्न आहे, पण शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीय आपल्या बाजूने आहेत आणि उद्धव ठाकरे एकटे पडलेत हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते," असं देसाई सांगतात.
 
नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच संधीचा फायदा घेण्यात शिंदे यशस्वी
"नरेंद्र मोदी यांनी जसं आलेल्या संधीचा लाभ घेतला त्याचप्रमाणे संधीचा लाभ घेण्यात शिंदे यशस्वी झाल्याचं दिसतं. नरेंद्र मोदी यांना मणिशंकर अय्यर यांनी चायवाला म्हटलं होतं. त्याचा वापर मोदींनी भाषणात केला. आपण चायवाले आहोत हे त्यांनी सांगितलं आणि लोकांची सहानुभूती घेतली," देसाई म्हणतात.
 
संजय राऊत यांनी बोलताना रिक्षावाला किंवा टपरीवाला असा उल्लेख केला होता. शिंदे यांनी देखील त्यावर प्रत्युत्तर दिले आणि फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलेच लोक मुख्यमंत्री व्हावेत का असा सवाल विचारला.
 
"राजकारणात एकमेकांना दोष प्रत्यारोप केले जातात पण त्याचा वापर विरोधक आपल्या सोयीने करू शकतात हा देखील एक भाग आहे असं देसाई सांगतात. आणि त्यात शिंदे सरस ठरल्याचे दिसत आहे. त्यांना जे पण कुणी बोललं त्याचा फायदा करून घेण्याचा किंवा बाजी पलटवण्याचा मोदी पॅटर्न शिंदेंनी राबवला," असं देसाई सांगतात.
 
पीएफआयवरील कारवाईचे स्वागत सामनाने केले होते
"आपल्या भाषणादरम्यान शिंदे म्हणाले की पीएफआयवर केंद्राने कारवाई केली. पण त्याबद्दल ते काही बोलले नाही. पण सामनाने पीएफआयवरील कारवाईचे स्वागत केले. शिंदेंकडून ही फॅक्चुअल चूक झाली," असं देसाई म्हणतात.
 
"शिंदेंनी आपल्या भाषणात हे सांगितलं की त्यांनी केव्हा केव्हा काय केलं. मदतीला तत्पर असणारे कार्यकर्ता आणि नेता अशी शिंदेंची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला हे सांगितिले की तुमच्यासारखाच आणि तुमचं म्हणणं ऐकून घेणारा, समजून घेणाराच माणूस मुख्यमंत्री आहे. तेव्हा हा त्यांच्या भाषणाचा हायपॉइंट होता," असं देसाई यांना वाटतं."
 
शिंदेंच्या नातवाबद्दल उद्धव बोलले
उद्धव ठाकरेंनी भाषणादरम्यान म्हटले की तुमच्या नातवाचा डोळा आता नगरसेवक पदावर आहे. याबाबत देसाई म्हणतात की "कुटुंबातील वैयक्तिक टीका करणे हे चूकच आहे.
 
देसाई सांगतात, "बोलण्याच्या ओघात तसे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे देखील तितकेच खरे आहे की त्याचा उपयोग समोरची व्यक्ती कशा प्रकारे करेल हे तुमच्या हातात नाही. त्यांच्या नातवाबद्दल बोलल्यावर शिंदे लगेच म्हणाले की तो जन्मला आणि तुमच्या अधःपतनाला सुरुवात झाली."
 
एकनाथ शिंदे आपल्या भाषणात काय बोलले हे आपण पाहू....
आम्ही नाही, तुम्हीच गद्दारी केली- एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
आमच्या भूमिकेला जनसामान्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच या ठिकाणी इतकी गर्दी जमा झाली आहे. शेवटची व्यक्ती देखील दिसत नाहीये असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात केली.
 
"खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर या जनसागराने दिलं आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
"हजारो शिवसैनिकांनी मिळून जो पक्ष उभारला तो आपल्या हव्यासासाठी गहाण टाकलात. तुम्ही राष्ट्रवादीच्या तालावर नाचलात," असा टोमणा एकनाथ शिंदेंनी लगावला.
 
"ज्या पक्षाचा उल्लेख बाळासाहेबांनी स्काउंड्रल्स असा केला होता त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली."
 
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले "गेल्या तीन महिन्यांपासून मी लोकांमध्ये फिरतोय, सर्व ठिकाणी लहान थोर लोक आमच्या स्वागतासाठी उभे आहेत. जर आम्ही गद्दारी केली असती तर तुम्ही आमच्यासोबत आला असता का असा सवाल एकनाथ शिंदेंनी मेळाव्यास उपस्थित असलेल्या लोकांना केला."
 
"ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे ना एकनाथ शिंदेंची नाही, तर ही शिवसेना केवळ शिवसैनिकांची आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणाऱ्या लोकांची ही शिवसेना आहे."
 
"आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आणि शिलेदार आहोत," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
'ही गद्दारी नाही गदर आहे'
एकनाथ शिंदे म्हणाले "तुम्ही आम्हाला म्हणतात आम्ही गद्दार आहोत. पण ही गद्दारी नाही तर हा गदर आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार गहाण टाकलेत. तुम्ही म्हणतात बाप चोरणारी टोळी आली आहे, पण आम्ही असं म्हणावं का तुम्ही बापाचे विचार विकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय म्हणायचं, असं एकनाथ शिंदेंनी विचारलं."
 
"तुम्ही बाळासाहेबांचे विचार विकण्याचा प्रयत्न केला, खरे गद्दार तुम्हीच आहात," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
"तुम्ही जे पाप केलं त्यासाठी तुम्ही बाळासाहेबांच्या समाधीवर माफी मागावी," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
"दहशतवादी याकुब मेननची फाशी रद्द करा अशी मागणी करणाऱ्या लोकांना यांनी मंत्रिपद दिलं ही गद्दारी नाही का?" असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
मग तुम्ही का राजीनामे दिले नाहीत?
"तुम्ही आम्हाला म्हणाले की आम्ही राजीनामे द्यावे आणि मग सत्तेत यावे, जेव्हा 2019 मध्ये तुम्ही जनादेश डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी तुम्ही राजीनामे दिले का?" असा सवाल शिंदे यांनी विचारला.
 
"तुम्ही अडीच तास देखील मंत्रालयात गेला नाहीत, लोक तुम्हाला कंटाळले होते."
 
"आज हिंदुस्तानात पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात आहेत पण तुम्ही त्यावर एक चकार शब्द देखील बोलत नाहीत," शिंदे म्हणाले.
 
"तुम्ही पीएफआयवर एकही शब्द बोलला नाही, देशविघातक कारवाया करणाऱ्यांना मोकळं सोडलं जाणार नाही. पण तुम्ही त्यावर का बोलला नाहीत. अशा संघटनांचा बिमोड केला जाईल ही आमची भूमिका आहे."
 
"पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आरएसएस वर बंदी घालावी अशी हास्यास्पद भूमिका घेतली आहे. ही कोणत्या राष्ट्रवादी नेत्याची भूमिका आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. देशाच्या उभारणीत आरएसएसचे मोठे योगदान आहे. प्रत्येक आपत्तीत त्यांनी लोकांची सेवा केली आहे हे आपण पाहिलं आहे," असं शिंदे म्हणाले.
 
'ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही '
 
"बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती. पण ते कधीही त्यांच्यासोबत गेले नाहीत. तुम्ही का गेला?" असे शिंदे यांनी विचारले.
 
"ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. ही काही कंपनी नाही की पाहिजे त्या व्यक्तीसोबत पार्टनरशिप केली आणि कंपनी चालवली. त्यामुळेच आम्ही बंड केलं."
 
"शिवसेना ही लोकांनी आपल्या कष्टाने आणि रक्ताने बनली आहे. हजारो लाखो शिवसैनिक सोडून गेले तरी तुम्ही म्हणालात की बाण गेले पण धनुष्य माझ्याकडे आहे. आता तरी डोळे उघडा," असा टोला शिंदेंनी लगावला.
 
मोदींना हिणवल्याचा परिणाम काय झाला?
"काँग्रेसने नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली. ते चहावाले आहेत असं तुम्ही म्हणाले. आज त्या पक्षाची काय अवस्था झाली आहे? आज त्या पक्षाला अध्यक्ष मिळत नाहीये," याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
 
"एक तो पक्ष आहे पण त्यांच्याकडे अध्यक्ष नाही आणि इकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही," असा टोमणा त्यांनी मारला.
 
"बाळासाहेबांचे विचार आणि स्वप्नं अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं आणि राममंदिराचं स्वप्न यांनीच पूर्ण केलं," असं शिंदे म्हणतात.
 
'मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणलं गेलं'
एकनाथ शिंदे म्हणाले "मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हटलं गेलं. मी म्हणतो हो आहे मी कंत्राटी. या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं कंत्राट आम्ही घेतलं."
 
"या राज्याला सुजलाम सुफलाम बनवण्याचं कंत्राट मी घेतलं आहे."
 
सावकरांचा अपमान सहन केला जाणार नाही
"एकवेळ मी माझं दुकान बंद करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही असं बाळासाहेब म्हणाले होते. पण तुम्ही गेलात. भ्रष्टाचारात काँग्रेसचा रावण जाळायचाय असं बाळासाहेब म्हणाले होते. आणि आज तुम्ही त्यांचीच मदत घेऊन तुमच्या मेळाव्याला माणसं जमवत आहात," असं शिंदे बोलले.
 
"सावरकरांचा उल्लेख काँग्रेसने माफीवीर असा केला आहे. त्यांच्यासोबत तुम्ही गेलात," असं शिंदे म्हणाले.
 
"बाळासाहेबांचं कुटुंब हे शिवेसना होतं पण तुमचं कुटुंब हीच शिवसेना बनली आहे. हम दो हमारे दो असंच आहे तुमचं."
 
"आम्ही घरी कधी जाणार हे आम्हाला माहीत नसतं, सातच्या आत घरात ही आमची संस्कृती नाही. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे आमचं ध्येय आहे," अशी भूमिका शिंदेंनी मांडली.
 
दि. बा. पाटील यांचे नाव आम्हीच पुढे केला
"दि. बा. पाटील यांच्या नावाला तुम्हीच विरोध केला आणि म्हणालात नगर विकास मंत्र्यांनीच विरोध केला. हा निव्वळ खोटारडेपणा आहे. आम्ही बहुमतात आहोत आम्ही दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला," असे शिंदे म्हणाले.
 
कटप्पा दुटप्पी नव्हता?
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात एकनाथ शिंदेंचा उल्लेख कटअप्पा म्हणजेच कट करणारा असा केला. त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की कटप्पा हा प्रामाणिक होता तुमच्या सारखा दुटप्पी नव्हता.
 
"ते म्हणतात की मी तुमचा कोथळा बाहेर काढाल, कोथळा तर सोडा तुम्ही कधी कुणाला चापट तरी मारलीत का?"
 
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात एकनाथ शिंदेंच्या कुटुंबावर भाष्य केले त्यावर देखील एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले.
 
"ते भाषणावेळी म्हणाले की बाप मुख्यमंत्री, कार्टं म्हणजे श्रीकांत खासदार, आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळा लावून बसला आहे. तुम्ही माझ्या दीड वर्षाच्या नातवाला राजकारणात ओढत आहात. तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी तो जन्मला तेव्हापासून तुमच्या अधःपतन सुरू झालं आहे."