गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified सोमवार, 18 जानेवारी 2021 (17:06 IST)

चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेनेचा विजय, राधाकृष्ण विखे पाटलांनाही धक्का

परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय मिळाला आहे.
 
वंजारवाडी आणि रेवली इथल्या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीनं बिनविरोध विजय मिळवला असून सरफराजपुर आणि मोहा इते निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चवस्व प्रस्थापित केलं आहे.
 
परळी पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकितही धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे.
 
अंबाजोगाईत निवडणूक झालेल्या 5 पैकी 3 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून 3 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या.
 
राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगरमध्ये माजी मंत्री, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे. त्यांच्या शेजारच्या लोणी खुर्द गावात विखेंच्या संबंधित पॅनेलचा पराभव झाला आहे. 17 पैकी 13 जागा जिंकत विरोधकांनी विजय मिळवला आहे.
 
विखे यांच्या लोणी बुद्रुक गावातील निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे.
 
यशोमती ठाकूर यांनी गड राखला
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरीत काँग्रेसची एकहाती सत्ता. यशोमती ठाकूर यांच आपल्या गावात वर्चस्व कायम राखलं. ठाकूर पॅनलने 13 पैकी 7 जागांवर विजय मिळवला.
 
राम शिंदेंना धक्का
भाजप नेते राम शिंदे यांना धक्का बसला आहे. त्यांच्या चौंडी गावात राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलनं विजय मिळवला आहे.
 
चंद्रकांत पाटलांच्या खानापूर गावात शिवसेनेची बाजी
कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तातुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये शिवसेनेने सहा जागा जिंकत बाजी मारली आहे. 9 जागांपैकी 6 जागावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. खानापूर ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या निवडणूकीत या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता येणार यासाठी चुरस होती.
 
खानापूर गावाच्या ग्रामपंचायत निकालावर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
 
खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं जन्मगाव आहे. या गावात आधी भाजपची सत्ता होती. मात्र निवडणूकीआधी झालेल्या पक्षांतरातून वेगळी समीकरणं समोर आली. या गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस, आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले होते. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना खानापूरमध्ये मात्र भाजप प्रणित आघाडीसोबत दोन्ही कॉग्रेस एकत्र लढल्या.
 
शिवसेनेच्या झेंड्याखाली बाळासाहेब पोपळे, राजू पाटील, मानसिंग दबडे यांची रांगणा माऊली आघाडी होती. तर भाजपचे प्रविण सावंत, राष्ट्रवादीचे संजय रेडकर आणि कॉंग्रेसचे भूजंगराव मगदूम यांची तळेमाऊली आघाडी होती. गेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार चंद्रकांत पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या राधानगरी - भूदरगड या मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती.
 
त्यावेळी निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं. त्यामुळं या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. सध्या प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे जिल्ह्यातील एरमेव आमदार आहेत. निवडणूकीनंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यातली दरी वाढत गेली.
 
स्थानिक पातळीवर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस भाजपसोबत गेल्याने खानापूरकडे सर्वाचं विशेष लक्ष लागलं होतं. त्यात प्रकाश आबिटकर यांनी सत्ता खेचून आणल्याने शिवसेनेचं पारडं जड झाल्याचं मानलं जातं आहे.