विनीत खरे
बीबीसी प्रतिनिधी, वॉशिंग्टनहून
20 जानेवारी रोजी जो बायडन हे अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यांच्या शपथविधीच्या काही तासांआधीच अमेरिकेच्या राजधानीला छावणीचे स्वरूप आले आहे. अशी स्थिती ही अभूतपूर्वच आहे असं म्हणावं लागेल.
केवळ वॉशिंग्टनच नव्हे तर देशातील 50 राज्यांच्या राजधान्या देखील कडक सुरक्षेत आहेत.
कॅपिटल हॉलवर जशी हिंसा झाली तशा हिंसेची पुनरावृत्ती ट्रंप समर्थक करणार तर नाहीत अशी भीती अनेकांना सतावत आहे.
राजधानीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक पहारा देण्यात येत आहे. त्या ठिकाणी हजारो सैनिक पेट्रोलिंग करत आहेत. जागोजागी नाकेबंदी करण्यात आली आहे. चेहऱ्याला झाकलेले सुरक्षा रक्षक जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची चेकिंग करत आहेत.
किमान 25 हजार नॅशनल गार्ड्स शहरात तैनात करण्यात आल्याचं माध्यमांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर सुरक्षा रक्षकांचीही तपासणी केली जात आहे कारण 6 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात त्यांनी देखील सहभाग घेतला होता अशा संशय आहे.
शपथ समारोहाच्या दिवशी सशस्त्र हल्ला होऊ शकतो अशी भीती काही माध्यमांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांच्या कार रस्त्यावर पेट्रोलिंगच काम करत आहेत तसेच हेलिकॉप्टरने देखील आकाशातून पाहणी केली जात आहे.
रस्त्यावर जागोजागी पांढऱ्या रंगाचे टेंट दिसत आहेत. ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा रक्षकांनी तळ ठोकला आहे.
कित्येक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. कॅपिटल कॉम्प्लेक्स जनतेसाठी बंद करण्यात आलं आहे. 20 जानेवारीला जनता कॅपिटल ग्राउंडला भेट देऊ शकणार नाही.
पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की जर कुणी देखील कॅपिटल ग्राउंडचे कंपाउंड बेकायदेशीररीत्या ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला अटक करण्यात येईल.
वॉशिंग्टनला इतर शहरांपासून जोडणारा व्हर्जिनिया पूलदेखील या काळात बंद ठेवण्यात येणार आहे.
ओसाड वॉशिंग्टन
नेहमी गजबजलेले वॉशिंग्टन शहर अगदी ओसाड पडले आहे. काही लोकांसाठी तर हा अनुभव रोमांचक ठरत आहे.
क्रिस अकोस्टा नावाचे स्थानिक गृहस्थ सांगतात की असं वाटतं आहे की एखादा चित्रपट सुरू आहे. सर्वजण नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या तयारीत आहे आणि सर्व रस्ते मात्र ओसाड पडलेले आहेत.
जर्मन ब्रायंट म्हणतात की मला असं वाटतं की पहिला व्हर्च्युअल शपथविधी ठरेल. साधारणतः जेव्हा शपथविधी होतो तेव्हा वॉशिंग्टनमध्ये उत्साहाचे वातावरण असते पण आता तर असं वाटतं आहे की शहराला भुताची बाधा झाली आहे.
ब्रायंट यांच्या म्हणण्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. जेव्हा शपथविधी होतो तेव्हा समर्थक आणि विरोधक समोरासमोर येऊन नारेबाजी करताना दिसतात. हा प्रसंग देखील उत्सवासारखाच असतो.
हार्ट ऑफ सिटी मानलं जाणारं कॅपिटल हिल क्षेत्र तर निर्जन झालं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की यावेळी नेहमीसारखी गर्दी दिसणार नाही.
देशाच्या राजधानीमध्ये तर कडक सुरक्षा व्यवस्था आहे पण देशातील सर्व राज्यांमध्ये काय होईल याची चिंता तज्ज्ञांना सतावत आहे. एकही हल्ला झाला तर घरात बसलेल्या ट्रंप समर्थकांना प्रक्षोभित करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो असं त्यांना वाटतं.